Tarun Bharat

सांगलीत मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद आणि विरोधही

प्रतिनिधी/सांगली

राज्य शासनाने मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मुभाही देण्यात आली आहे. पण या कारवाईच्या बडग्याविरोधात व्यापाऱ्यांनी आवाज उठविण्यास प्रारंभ केला आहे. पण काहीजणांनी मात्र या मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बुधवारी सांगली शहरात कडक मिनी लॉकडाऊनचे चित्र दिसून येत होते. प्रत्येक गल्लीत पोलीस तैनात केल्याने कोणीही या लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला नाही.

मंगळवारचा विरोध बुधवारी मावळला

मंगळवारी या लॉकडाऊनला सांगली बाजारपेठेतील व्यापाऱयांनी मोठयाप्रमाणात विरोध दर्शविला होता. पण महापालिकेच्या प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने हा विरोध मोडून मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी केली होती. तरीसुध्दा अनेक व्यापाऱयांनी वादावादी करून काही ठिकाणी दुकाने उघडी ठेवली होती. त्यानंतर आयुक्तांनी थेट या व्यापाऱयांना बोलावून या लॉकडाऊनच्या विरोधात कोणतीही भूमिका घेवू नये नियमानुसार ज्यांना परवानगी आहे त्यांनीच दुकाने उघडावीत अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. याचा परिणाम बुधवारी दिसून आला अनेक दुकानदारांनी आपली दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे सकाळपासूनच या कडक मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून आले.

पोलीसांच्याकडून प्रत्येक गल्लीत गस्त

मिनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱयाविरोधात कडक कारवाईचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळपासून बाजारपेठेतील प्रत्येक गल्लीत पोलीसांनी गस्त घालण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्याचे धाडस केले नाही. पण अनेक व्यापाऱयांनी एकत्रित येत या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी बैठका घेतल्या. दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात प्रत्येक व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक झाली. या बैठकीत या व्यापाऱयांनी मिनी लॉकडाऊन म्हणजे आमच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे. त्याला विरोध केला पाहिजे असे सांगत याठिकाणी त्यांनी या मिनी लॉकडाऊनला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात सर्व व्यापाऱयांनी एकत्रित येत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला. याला आमदार सुधीर गाडगीळ यांनीही होकार दिला असल्याने आमदार गाडगीळ यांच्या नेत्तृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या व्यापाऱयांनी विकेंड लॉकडाऊनला परवानगी दिली आहे. पण सोमवार ते शुक्रवार मात्र कोणतीही बंदी नको असे त्यांनी सांगितले. तसेच नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासनही दिले आहे.

अत्यावश्यक सेवामध्येच गोंधळ

या मिनी लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा कोणकोणत्या याबाबत व्यवस्थित माहिती समोर येत नसल्याने अनेक दुकानदारांचा गोंधळ झाला आहे. तसेच हॉटेलमध्ये बसून जेवण अथवा नाष्टा करता येणार नाही पण पार्सल नेता येणार आहे. त्यामुळे हॉटेल चालकांच्यामध्ये याबाबत गोंधळ झाला आहे. याशिवाय मेडिकल आणि किराना मालाचे दुकान सोडून इतर कोणकोणत्या आस्थापनाना परवानगी दिली आहे. याची चौकशी अनेक दुकानदारांनी प्रशासनाकडे केली आहे. पण त्याबाबतही त्यांना योग्य माहिती न मिळाल्याने बाजारपेठेत गोंधळ उडाला आहे.

Related Stories

आमदार रोहित पवार यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट

Archana Banage

Sangli : मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना फटका; मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊस

Abhijeet Khandekar

‘राजारामबापू’च्या तिन्ही युनिटच्या गळीत हंगामास 6 नोव्हेंबरपासून शुभारंभ

Archana Banage

कासेगाव येथे डोक्यात दगड घालून एकाचा खून

Archana Banage

सांगली : वडगावचे जवान दशरथ पाटील जम्मूत शहीद

Archana Banage

सांगली : अज्ञात वाहनाच्या धडकेत करंजवडेतील युवक ठार

Archana Banage
error: Content is protected !!