Tarun Bharat

सांगली : आघाडी एकसंघ, भाजप गॅसवर!

Advertisements

बहुमत असूनही भाजपची अवस्था दयनीय : सात सदस्य गायबच : नेत्यांचा आत्मविश्वास ढळला : आज चित्र स्पष्ट होणार

प्रतिनिधी / सांगली

महापौर, उपमहापौर निवडीस अवघा एक दिवस बाकी आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सर्व नगरसेवक एकत्र सहलीचा आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे भाजपची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांचे सात सदस्य अजूनही गायबच आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. दरम्यान, संपूर्ण लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

महापौर, उपमहापौर निवड मंगळवारी (दि. 23) होणार आहेत. महापालिकेत दोन सहयोगी सदस्यांसह भाजपकडे 41 सदस्यांचे बळ आहे. तर विरोधी काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादीकडे 15 असे 34 सदस्यांचे बळ आहे. बहुमत असूनही भाजपची अवस्था दयनीय झाली आहे. गत अडीच वर्षात नगरसेवकांमध्ये भाजप नेते, कोअर कमिटी सदस्यांबाबात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्याचा वचपा महापौर, उपमहापौर निवडीत काढण्यासाठी भाजप नगरसेवकांचा मोठा गट सज्ज झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपचे 9 सदस्य गायब झाले होते.

भाजप नेत्यांचा आत्मविश्वास ढळला

त्यापैकी दोन सदस्य परत भाजपच्या छावणीत आले आहेत. मात्र सात सदस्य अजूनही गायब आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गायब सदस्यांचा शोध घेण्यात येत आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने भाजपची अवस्था दयनीय झाली आहे. सात सदस्यांच्यामुळे भाजपवर सत्ता गमाविण्याची वेळ आली आहे. भाजपने उर्वरित नगरसेवकांना गोवा येथे सहलीसाठी पाठवले आहे. मात्र तिथेही नाराजी आहे. अनेक सदस्य थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास ढळू लागला आहे. गायब झालेल्या सदस्यांबाबत भाजपचा एकही नेता, पदाधिकारी थेट बोलत नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात आलबेल नसल्याचेच चित्र पहायला मिळत आहे.

आघाडी एकसंघ, नगरसेवक सहलीवर

दुसरीकडे महापौर पदावरुन वाद सुरु असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम असल्याचे चित्र आहे. दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक एकसंघपणे सहलीचा आनंद लुटत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये महापौर पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. मात्र महापौरपद कोणालाही मिळो आम्ही एकसंघच आहोत. विजय खेचून  आणू, असा आत्मविश्वास दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक व्यक्त करत आहेत. नेते सांगतील ती भूमिका मान्य असल्याचे नगरसेवक सांगत आहेत. आघाडीच्या नगरसेवकांकडून भाजपची सत्ता उलथविण्यासाठीची रणणिती आखण्यात आली आहे.

आज चित्र स्पष्ट होणार

काँग्रेसने महापौरपदासाठी उत्तम साखळकर यांचे नाव पुढे केले आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांनीही साखळकर यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांचे अर्ज महापौर पदासाठी दाखल केले आहेत. सूर्यवंशी व बागवान यांच्यापैकी कोण याचे उत्तर मात्र अस्पष्ट आहे. काँग्रेसकडे महापौरपद राहिल्यास साखळकर लढतील. पण, ऐनवेळी राष्ट्रवादीकडे महापौरपद गेल्यास उमेदवार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबतचे चित्रही सोमवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आजचा दिवस महत्वाचा

महापौर, उपमहापौर निवड उद्या मंगळवारी होणार आहे. त्यामुळे आज सोमवारचा दिवस महत्त्वाचा आहे. गायब सात सदस्यांचा आज छडा न लागल्यास भाजपला महापालिकेतील सत्तेवर पाणी सोडावे लागणार आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये महापौरपदावरुन तिढा न सुटल्यास ऐनवेळी सगळे मुसळ केरात जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे आज सोमवारी घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेत पक्षनिहाय संख्याबळ

पक्ष                                                  सदस्य संख्या

भाजप (दोन सहयोगी सदस्यांसह)                  43

काँग्रेस                                                     19

राष्ट्रवादी                                        15

बहुमतासाठी संख्याबळ                              39

आघाडीला हवेत                                         05     

              

Related Stories

वारकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

पुणे-मिरज-लोंढा विद्युतीकरण ७० टक्के पूर्ण

Abhijeet Shinde

सांगली : शिट्टी वाजली… गाडी सुटली…!

Abhijeet Shinde

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी असलम भाई बागवान

Abhijeet Shinde

जत येथे वाळू तस्करावर कारवाई, पाच वाहने जप्त

Abhijeet Shinde

चोऱ्या रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल ठेवणार पाळत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!