प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात दाखल : तालुका होणार 61 गावांचा
प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यात सध्या 54 ग्रामपंचायती असून त्यामधील सात ग्रामपंचायतींचे विभाजन होवून आता नव्याने सात ग्रामपंचायतींची भर पडणार आहे. त्यामुळे कडेगाव तालुका हा लवकरच 61 गावांचा होणार आहे. नव्याने होणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबई येथे मंत्रालयात दाखल झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वांग-मराठवाडी धरणासाठी तेथील घोटील, उमरकांचन, केकताईनगर, आदर्शनगर, वांगरेठरे व मेंढ या सहा गावांतील प्रकल्पग्रस्तांचे कडेगाव तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामध्ये घोटील येथील नागरिकांचे येथील कोतीज येथे, उमरकांचन येथील नागरिकांचे नेवरी येथे, केकताईनगर येथील नागरिकांचे तोंडोली येथे, आदर्शनगर येथील नागरिकांचे विहापूर येथे, वांगरेठरे येथील नागरिकांचे शाळगाव येथे तर मेंढ येथील नागरिकांचे शिवाजीनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे.
त्यामुळे येथील पुनर्वसनग्रस्तांनी शासनाकडे स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती. त्यामुळे शासनानेही पुनर्वसनग्रस्तांची मागणी मान्य करत त्यांचेसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील घोटील, उमरकांचन, केकताईनगर, आदर्शनगर, वांगरेठरे, मेंढ या प्रत्येक पुनर्वसित वसाहतींसाठी आता लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली जाणार आहे.