संघटनेचे सचिव डॉ. अभिजीत निकम यांची माहिती
प्रतिनिधी/विटा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण होणारी भीती, या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका निमा संघटनेच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना बाधित रुग्ण, नातेवाईक, संशयित रुग्ण यांना उपक्रमात सहभागी डॉक्टर फोनवरून मार्गदर्शन करतील अशी माहिती संघटनेचे सचिव डॉ. अभिजित निकम यांनी दिली.
याबाबत डॉ. अभिजीत निकम यांनी दिलेली माहिती अशी, निमा डॉक्टर्स संघटनेच्यावतीने विटा आणि खानापूर तालुक्यातील लोकांना आरोग्य विषयक समस्या, कोरोना संदर्भात माहिती यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. ज्यामध्ये रुग्णांना मानसिक आधारदेणे, पॉझिटिव्ह रुग्णांना उपचाराची माहिती देणे, निगेटिव्ह रुग्णांना मार्गदर्शन, पॉझिटिव्ह रुग्णांना सल्ला, रुग्णाची परिस्थिती याबाबत माहिती, उपचाराबाबत मार्गदर्शन, चाचणी संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
याशिवाय शक्य असेल ती मदत रुग्णांना करणार आहोत. जेणेकरून सर्वांना आरोग्य आधार मिळेल. त्यामध्ये सहभागी डॉक्टरांचे ऑनलाईन प्रशिक्षण होईल. हे प्रशिक्षण आपल्याला पुढे रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. उद्या बुधवारपासून ही हेल्पलाईन चालू करत आहोत, असे डॉ. निकम यांनी सांगितले.
कोरोना रुग्णामधील मानसिक स्थिती आणि त्यावर करावयाचे समुपदेशन, याबाबत उपक्रमात सहभागी डॉक्टरांचे ऑनलाईन शिबीर होणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय
कोरोना संदर्भातील टेस्टिंग, कोव्हीड केअर सेंटर, संस्थात्मक विलगिकरण कक्ष याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
कोव्हीड रुग्णालय, कोव्हीड समर्पित रुग्णालयात होणारे उपचार, उपलब्ध सुविधा, गृह विलगिकरण नियम, द्यायची माहिती , रुग्णांच्या समस्या याबाबत शासनाचे निर्देश याची माहिती, सहभागी डॉक्टरांना देण्यात येणार आहे. ही माहिती रुग्णांना समुपदेशन करण्यासाठी उपयोगी ठरेल, अशी माहिती संघटनेचे सचिव डॉ. निकम यांनी दिली.


previous post