वार्ताहर / खानापूर
राज्य परिवहन महामंडळाने नुकत्याच राज्यात आंतरजालीय बससेवा सुरू केली आहे. तोपर्यंतच महामंडळाने बसस्थानकावरील वाणिज्य अस्थापनांना बस सेवा सुरू झाल्या दिवसापासून परवाना शुल्क भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात बस सेवा सुरू होऊनही अत्यल्प प्रवाशी मर्यादा आणि त्यातही बाहेर काही खरेदी न करण्याच्या मानसिकतेत स्टॉलधारक अडकला असताना महामंडळाने परवाना शुल्क भरण्याची नोटीस देऊन व्यवसायिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. अडचणीतील व्यावसायिकांना नाममात्र भाडे आकारण्याची मागणी स्टॉलधारक करत आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली बस सेवा राज्य परिवहन महामंडळाने २० ऑगस्टपासून चालू केली आहे. मात्र यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक सहा महिन्यांपूर्वीच्या तुलनेत फक्त पाच टक्के बस सेवा सुरू झाली आहे. त्यातही बस मध्ये २२ प्रवासी बसण्याची अट असून यामध्ये सध्या दहा ते पंधरा प्रवाशी प्रवास करत आहेत. या प्रवाशांपैकी खूपच कमी प्रवाशांची बस स्थानकावरील स्टॉलवरून काही वस्तू खरेदी करण्याची मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे बसस्थानकावरील स्टॉलधारक व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.
कोरोना महामारीमुळे देशात अचानक बंद पुकारण्यात आला त्यामुळे सहा महिने दुकाने बंद राहिली असून स्टॉलमधील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक बंद झाल्याने स्टॉल धारकांना मोठा आर्थिक फटका बसल्याने व्यावसायिक खचून गेला आहे. सध्या ही दुकाने चालू करण्याची नोटीस राज्य परिवहन महामंडळाने दिली असली तरी प्रवाशी संख्येत घट आणि प्रवाशांवर हा व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोनाचे वातावरण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत या स्टॉलधारकांपुढे अडचण राहणार आहे.
वास्तविक, राज्य परिवहन महामंडळास बस स्थानकावरील स्टॉलधारकांनी आजपर्यंत भाड्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून दिले आहे. अनेक ठिकाणी फक्त १० फूट × १० फूट सारख्या जागेसाठी पाच हजारांपासून ४० ते ५० हजारांपर्यंत भाडे दिले आहे. सध्या परिस्थितीत महामंडळाची भाडेवाढही जाचक असून यामध्ये हजारो रुपयांची भाडेवाढ करण्यात येत असते. तसेच जो व्यवसाय करणार आहे तोच व्यवसाय करण्याची सक्ती महामंडळाने केलेली असल्याने स्टॉल धारकास परवडेल किंवा न परवडेल तरीही त्यात दुसरा कोणता माल विकता येत नाही. अशा जाचक अटी व भाडेवाढीने स्टॉलधारक अडचणीत आलेला आहे.
सध्या कोरोनाने स्टॉल धारकांना अडचणीत आणलेले असताना राज्य परिवहन महामंडळाने मदत करण्याऐवजी परवाना शुल्क आकारण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था स्टॉल धारकांची झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत नाममात्र भाडे आकारणी करावी. तसेच बस स्थानक हे राज्य शासनाच्या अधिपत्याखाली येत असल्याने व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी विमा संरक्षण व बंद काळासाठी भरपाई किंवा आर्थिक मदत करण्याची मागणी स्टॉलधारक करत आहेत.


previous post