प्रतिनिधी / कुपवाड
स्वतःच्या बापालाच सतत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सुनेविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
तानंगमधील बापू नारायण कदम (७३, रा.कदम मळा) असे गळफास घेऊन आत्महत्त्या केलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांचा मुलगा संजय बापू कदम व सुन रेखा संजय कदम दोघेही रा. कदम मळा, तानंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मयत वृद्धाचा दूसरा मुलगा खंडेराव कदम यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलोसानी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर लाकडी ओंडके का टाकले ? या कारणावरून फिर्यादीचे वडील बापू कदम यांना त्यांचा मुलगा संजय कदम व त्याची पत्नी रेखा कदम या दोघांनी चुलते जालिंदर, चुलती शालन, चुलत भाऊ कृष्णा तसेच फिर्यादीची पत्नी मनीषा यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यामुळे खंडेराव यांच्या वडिलांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर ५ मे रोजीच्या एका वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन वडिलांची बदनामी केली होती. त्यांनी वडिलांना वारंवार शिवीगाळ, मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळूनच २४ जुलै रोजी वडील बापू कदम यांनी घरातील लाकडी तुळीस गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित संजय कदम व रेखा कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

