वार्ताहर / दिघंची
मुसळधार पाऊसाने ऐतिहासिक राजेवाडी तलाव भरताच तेथे पर्यटन फुल्ल झाल्याचे चित्र रविवारी पाहण्यास मिळाले मात्र नागरिकांना अजून देखील कोरोना महामारीचे गांभीर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोना काळात लोकांना विरंगुळा जरी निर्माण झाला असला तरी नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंग चा मात्र फज्जा उडताना दिसत आहे.
गुरुवारी पहाटे राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सलग दुसऱ्या वर्षी राजेवाडी तलाव भरला. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. तलावाच्या सांडव्याची रचना व त्यावरून पडणारे पाणी याचे दृश्य मनमोहक आहे. मागील वर्षी हा परिसर एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे बहरला होता. सांगली, सोलापूर, सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या हद्दीवरील नागरिकांनी तलाव परिसराला भेट दिली होती. तलाव परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावर्षी देखील दोनच दिवसात नागरिकांनी पुन्हा एकदा हा परिसर फुलून गेला आहे. परंतु सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता ही होणारी गर्दी जोखमीची ठरू शकते. सध्या कोरोनाची सामूहिक संसर्गाची सुरुवात झाली आहे. सांगली जिल्हयात रोज हजाराच्यावर कोरोना बाधित आढळून येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. परंतु राजेवाडी तलावावर विरंगुळ्याच्या नावाखाली होणारी गर्दी पाहता लोकांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसत आहे.
एकीकडे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून शासन अनेक उपाययोजना करत आहे.कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन ,जनता कर्फ्युसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु एकीकडे अजूनही काही नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र अनेकठिकानी पहावयास मिळत आहे.


previous post
next post