द्राक्षांचे घड धुळीने माखले, खरेदीसाठी व्यापाऱ्यांची नापसंती
राज्य मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना रस्त्यावरील धुळीमुळे नुकसान
वार्ताहर / सलगरे
दराची घसरण, अवकाळी पाऊस, पाणी टंचाई या समस्या कमी आहेत. म्हणून की काय आता सलगरे येथील राज्य मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना रस्त्यावरील धुळीमुळे नुकसान सोसावे लागत आहे. अनेक एकर वरील द्राक्ष बागांमधील द्राक्षांचे घड धुळीने माखले आहेत. कोरोना, लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांची राज्य मार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रकारे धूळदाण झाली आहे.
मिरज तालुक्यात गेल्या वर्षभरापासून राज्यमार्ग क्रमांक 153 चे काम सुरू आहे. काम सुरू झाल्यापासून या कामात अजिबात सातत्य दिसून येत नाही. मिरज तालुक्यातील सलगरे-एरंडोली-टाकळी-मिरज या मार्गवरून हा रस्ता जातो.
सध्या या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या ठिकाणी खड्डे पाडून खडी टाकल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मोठमोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे येथील धुळीचे साम्राज्य थेट द्राक्षबागांवर पडते. अनेक एकरांवरील द्राक्ष बागा धुळीने माखल्या असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शिवाय द्राक्ष खरेदीदार व्यापारीही या बागांना पसंती देत नसल्याचे चित्र आहे.