Tarun Bharat

सांगली : रेल्वे ‘ट्रॅकवर’ पाटबंधारे ‘धारेवर’

पाटबंधारे विभागाला नोटीस

वार्ताहर / वसगडे

नांद्रे-वसगडे दरम्यान येरळा नदीवरील बंधार्‍याचे बरगे वेळेत न काढल्याने येरळा नदीच्या पुरात रेल्वे पुलाचा वसगडेकडील बाजुच्या एका पिलरचा भराव वाहून गेल्याचा ठपका रेल्वेने पाटबंधारे खात्यावर ठेवला आहे. त्यामुळे रेल्वेचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याबद्दल मध्य रेल्वे पुणे विभागीय व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी पाटबंधारे विभागाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे रेल्वे ‘ट्रॅकवर’ पाटबंधारे ‘धारेवर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पलूस तालुक्यातील वसगडेजवळ येरळा नदीवर रेल्वे पुला लगत पाटबंधारे विभागाचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून पावसाळ्याच्या सुरुवातीस जून महिन्यात बंधाऱ्याचे बरगे काढणे आवश्यक होते परंतु, पाटबंधारे विभागाने बरगे काढले नाहीत. राज्यात अतिवृष्टीचा इशारा असतानाही पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे मुसळधार पावसाने १५ ऑक्टोबर रोजी गुरुवारी रात्री येरळा नदीला पूर आला मात्र बरगे काढले नसल्याने पुराचे पाणी बंधार्‍यावरून वाहिल्याने नदीकाठावरील २५ मीटर शेती १० मीटर खोलीने वाहून गेली. पाण्याचा प्रचंड प्रवाह पुलाखालील भरावावर आदळून प्रवाहाने मिरज- पुणे रेल्वे मार्गावरील वसगडे बाजूकडील रेल्वेरूळा खालील पिलरचा मातीचा भराव वाहून गेला. पूर मोठा असल्याने सहा दिवस रेल्वे रूळ खालील भराव पुर्ण टाकता आला नाही. येथे असलेली संरक्षक भिंत पाडून पाण्याचा प्रवाह वळवून हा भराव टाकावा लागला.

रेल्वेपुलाच्या नांद्रे बाजूस पाटबंधारे विभागाने कठडा बांधल्याने तोच भाग सुरक्षित राहिला. परंतु वसगडे बाजूला संरक्षक भिंत नसल्याने पुलाखालील भराव वाहून गेल्याने रेल्वेचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे विभागीय व्यवस्थापक शर्मा यांनी पाटबंधारे विभागाला दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे. तसेच यामुळे मिरज-पुणे रेल्वे वाहतुक सुरळीत होणेस सहा दिवस लागले. या दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प होऊन दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. महाराष्ट्र एक्सप्रेस निजामुद्दीन निजामुद्दीन वास्को अशा लांब पल्ल्याच्या मह्त्त्वाच्या गाड्या पंढरपूरमार्गे वळविण्यात आल्या प्रसंगी गाड्या रद्दही केल्याने मोठे नुकसान झाल्याचा रेल्वेचे म्हणणे आहे. शुक्रवारी रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यात आली असून नेहमीप्रमाणे पाच गाड्या निर्धारीत वेळेत रवाना झाल्या होत्या.

रेल्वे व पाटबंधारे खाते यांच्यामध्ये ९०च्या दशकात झालेल्या करारानुसार बरगे जुनमध्ये काढून नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बसविणे आवश्यक असताना घाई का करण्यात आली ? हा संशोधनाचा विषय आहे. पाटबंधारेच्यावतीने वसगडे बंधाऱ्याची बरगे काढणे व स्वच्छ करुन बसविण्यासाठी २७ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. यासाठी मजूर सोसायटीच्या वतीने निविदा भरण्यात आल्या होत्या मात्र, त्या निविदा फोडण्यात आल्यात की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. वेळेत दरवाजे काढले असते तर हि घटना घडली नसती असा रेल्वेचे मत आहे. नियोजित रेल्वे दुहेरी मार्गामुळे हा बंधारा शिरगावकडील बाजुला एक किलोमिटर हलविण्याच्या सुचना देण्यात आल्याची चर्चा असल्याने तीन हजार एकर शेतीच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण होणार असल्याने याप्रश्नावरुन येरळा काठावरील शेतकर्‍यांच्या मधुन अस्वस्थता पसरली आहे.

Related Stories

बेवारस वाहनांच्या विरोधात महापालिकेची कारवाई तीव्र

Archana Banage

वसगडे-नांद्रे मार्गावर झाड कोसळले; राज्यमार्गाची वाहतुक ठप्प

Rahul Gadkar

सांगलीच्या दिव्यांग असलेल्या काजल कांबळेने वजीर सर करत घडविला इतिहास

Archana Banage

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

Archana Banage

सांगली : तानंग येथे वीज कनेक्शन तोडणार्‍या वायरमनला दमदाटी

Archana Banage

सांगलीचा मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत : ना. जयंतराव पाटील

Archana Banage
error: Content is protected !!