Tarun Bharat

सांगली : वसुलीसाठी तगादा, करगणीतील महिला सावकारवर गुन्हा

Advertisements

2 लाखाचे घेतले 7 लाख, आणखी 3 लाखांची मागणी

प्रतिनिधी/आटपाडी

आटपाडी तालुक्यातील करगणी येथील लक्ष्मी दबडे या खासगी सावकार महिलेवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. व्याजाने घेतलेल्या दोन लाखाच्या बदल्यात सुमारे सात लाख रूपये वसुल करूनही आणखी तीन लाखांची मागणी करणाऱ्या दबडे हिने २० टक्के व्याजदराने या वसुलीसाठी तगादा लावुन धमकी दिल्याने तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मी दबडे या खासगी सावकारकी करणाऱ्या महिलेकडून खरसुंडी येथील विनायक निवृत्ती सगरे याने दोन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यापोटी झालेल्या अन्यायी वसुलीबाबत सगरे याने आटपाडी पोलीसात तक्रार दिल्याने महाराष्ट्र सावकारकी अधिनियमान्वये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सदरचा प्रकार घडला असून बेकायदेशीर खासगी सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मी दबडे हिच्याकडुन सगरे याने अडचणीपोटी दोन लाख रूपये घेतले होते.

२०टक्के व्याजदराने दोन लाखापोटी ६ लाख ९५हजार रूपये सागरे याने लक्ष्मी दबड़े हिला दिले. तरी देखील मुद्दल दोन लाख आणि व्याजाचे एक लाख असे आणखी तीन लाख मागितले. त्या पैशासाठी सातत्याने फोनवरून धमकी, शिवीगाळ, मारहाणीचा इशारा सदर महिलेने दिला. त्याबाबत तक्रारदार विनायक सगरे व महिलेच्या सावकारीला बळी पडलेल्या अन्य लोकांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे धाव घेतली. त्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यासमोर जबाबही नोंदविला. त्या अनुषंगाने सदर बहुचर्चित महिला सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर खासगी सावकार महिलेने करगणीसह अनेक भागात मोठ्या व्याजदाराने बेकायदेशीर वसुली केल्या असुन आजपर्यंत तिच्याविरोधात कोणीही फिर्यादीसाठी पुढे येत नव्हते. अखेर काही मंडळींनी एकत्र येत अन्यायाला वाचा फोडत फिर्यादीचे धाडस दाखविले. सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्याने आणखी अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली.

error: Content is protected !!