Tarun Bharat

सांगली : संख अप्पर तहसील कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

अजूनही बहुतांश कामे होताहेत जत मधूनच; तात्काळ दुय्यम निंबधक कार्यालय सुरू करा-सुशीला होनमोरे

सोन्याळ / वार्ताहर

जत तालुक्यातील पूर्व भागातील संखसह उमदी, माडग्याळ तिकोंडी मुचंडी सर्कलमधील आदी गावातील लोकांना जमीनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि इतरकामी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. संखला अप्पर तहसील कार्यालय होऊन जानेवारी २०२० मध्ये दोन वर्षे पूर्ण झाले असले तरी किरकोळ कामकाज व नाममात्र दाखले वगळता इतर महत्त्वाचे कोणतेही काम याठिकाणी होत नसल्याने संख अप्पर तहसील कार्यालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. तरी राज्यसरकारने जत पूर्व भागातील लोकांची गैरसोय दूर होण्यासाठी संख येथे स्टॅम्प व्हेंडरसह नवीन दुय्यम निबंधक कार्यालयास मंजूरी देऊन जत पूर्व भागातील लोकांची सोय करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी लेखी निवेदनाव्दारे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जत हा तालुका सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असणारा कर्नाटक राज्याच्या सिमेवरील कायमस्वरूपी दुष्काळी असा तालुका आहे. भौगोलिक दृष्ट्या जत तालुक्याचा विस्तार खूप मोठा आहे. तालुक्याचे त्रिभाजन करून संख, उमदी व माडग्याळ येथे नवीन तालुका करण्याची येथील जनतेची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. तालुक्याच्या विभाजनाचा प्रस्ताव २००४ पासून प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. तालुक्यात १२३ गावे व २७६ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. लोकसंख्या चार लाखाहून अधिक आहे. दोन लाख २४ हजार ५३८ चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने सर्वात मोठा तालुका म्हणून जत तालुक्याची गणना केली जात आहे. हिंगोली जिल्ह्याइतके क्षेत्रफळ केवळ जत तालुक्याचे आहे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विभाजन किंवा त्रिभाजन करून नवीन तालुका होण्यासाठी लोकांचा रेठा वाढल्याने यावर जुजबी उपाय आणि मलमपट्टी म्हणून संख येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. सध्या जत येथे मुख्य तहसिल कार्यालय आहे. तालुक्याचा भौगोलिक विस्तार पाहता पूर्वभागातील संख येथे लोकांच्या मागणीवरून दोन वर्षांपूर्वी नव्याने अप्पर तहसिल कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. संख अप्पर तहसिल कार्यालय अंतर्गत मुचंडी, माडग्याळ,उमदी,तिकोंडी,व संख असे पाच मंडल विभाग येतात. या चार विभागात एकूण ६७ गावे असून या सर्व गावाचा नाममात्र महसुली कारभार हा अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चालतो. परंतु या कार्यालयात ठोस असे कोणतेही कामकाज चालत नाही. संख येथे अप्पर तहसिल कार्यालय झाल्यापासून जत पूर्व भागातील नागरिकांची एकच मागणी वारंवार जोर धरू लागली आहे की, राज्य सरकारने ज्या प्रमाणे जत पूर्व भागातील लोकांची अप्पर तहसिल कार्यालयाची मागणी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने पूर्ण करून विविध कामांनिमित्त ये-जा करण्यासाठी होणारा हेलपाटा, वेळ व पैशाची बचत करण्याचे काम केले आहे.त्याप्रमाणे इतर आवश्यक कार्यालय असणे महत्त्वाचे आहे. जमीन किंवा अन्य मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी महत्वाचे असलेले कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय होय. त्यासाठी नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून लोकांची होणारी अडचण व कमालीची गैरसोय दूर करावी यासाठी सोन्याळच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

संख येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू झाले असले तरी अजूनही महसुल विभागाची बहुतांशी कामे ही या कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. परंतु संख अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत पाच मंडल विभाग व या विभागातील ६७ गावातील लोकांना त्यांच्या जमिनिचे, घरजागेचे, प्लाॅटचे व्यवहार तसेच विविध बॅंकाकडील, सोसायट्याकडील तारण गहाणखत, तसेच बक्षिस पत्र व मृत्यूपत्र आदी कामासाठी येथील नागरिक व पक्षकारांना तालुक्याच्या ठिकाणी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातच येण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. पाच मंडलविभागातील एकूण ६७ गावातील लोकांची सोय म्हणून संख या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यास या भागातील लोकांचा जत येथे जाणे-येणेचा त्रास वाचणार आहे. व संख पासून जत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतरही लांब आहे. शिवाय जत दुय्यम निबंधक कार्यालयात आल्यानंतर जत पूर्व भागातील लोकांची कामे एका दिवसात न होता त्यासाठी चार- चार दिवस पक्षकारांना कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचा येथील पक्षकारांना अनेक वेळा अनुभव आला आहे. तसेच याकामी त्यांचा वेळ व पैसाही खर्च करावा लागत आहे. तरी नव्याने संख येथे दुय्यम निंबधक कार्यालय सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करावा. – कामण्णा पाटील, माजी सरपंच जालिहाळ खुर्द ता जत

Related Stories

अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करावे – ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

Archana Banage

पुणे शहरात आज 282 नवे कोरोना रूग्ण, 112 डिस्चार्ज!

Tousif Mujawar

आनेवाडीच्या जिल्हा बँकेत सोशल डिस्टनसचा फज्जा

Patil_p

सांगली : मिरजेतही मनपाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

Archana Banage

सांगली : …तर गांजा पिकवण्याची परवानगी मागा

Archana Banage

मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवाला धोका, सुरक्षा वाढवली

datta jadhav