Tarun Bharat

सांस्कृतिक कार्यक्रमांनी लोकराजाला अभिवादन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळय़ाची सांस्कृतिक कार्यक्रमांनी शोभा वाढवली. शाहीरी पोवाडा, लेझिम, झांजपथक, पोलीस बँड, बंजो आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. संजय आवळे यांनी हलगी वादन करून लोकार्पण सोहळय़ाची   शोभा वाढवली. अनेकांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वेशभुषा करून  सहभागी नोंदवला. शालेय विद्यार्थीनींनी नऊवारी साडी व कोल्हापुरी फेटे बांधून लेझिमचे सादरीकरण केले. 

नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळय़ाप्रसंगी शाहीर रंगराव पाटील यांनी ‘राखेत पेटली, अस्मितेची ठिणगी, भडकला वणवा साऱया देशात, मुजरा करूनी त्या महारूद्रास, शाहू महाराज यांचा गातो पोवाडा…..’ आणि ‘बहुजना देवूनी नोकरी केल कारभारी…..’ या पोवाडय़ांचे सादरीकरण केले. तर दसरा चौकातील सभास्थळी शाहीर डॉ. आझाद नायकवडी व डॉ. मनीषा नायकवडी, यांनी शाहू गौरव गीताचे शादरीकरण पेले. त्यांना नितेश साठे, रूचिता पाटील, अरूण शिंदे, स्वराज नायकवडी यांनी गायनाची साथ केली. तर विक्रम परीट यांनी ढोलकी, प्रदीप जिरगे यांनी सिंथेसायझरची साथ दिली. पोलीस बँडच्या वतीने करवीर संस्थांच्या गीताची धुन वाजवून राजर्षी शाहूंना मानवंदना देण्यात आली.

मुस्लिम बोर्डींगच्या वतीने काढलेला रॅलीत युसुफ मियाँ यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची भुमिका साकारली. तर तमिम शेख, कोजाज शेख यांनी चोपदारांची भूमिका साकारली होती. माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी मातंग वसाहत येथील समाजबांधवांनी शाहू मिल ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकापर्यंत पायी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेतील फुलांनी सजवलेल्या रथात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा होता. तर पारंपारिक वेशभुषेत अश्वावर स्वार झालेली व  लहान मुल रथयात्रेचे आकर्षण ठरली. पांढरा ड्रेस व राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नाव कोरलेल्य़ा गांधी टोपी रॅलीतील प्रत्येकाने परिधान केली होती. झांजपथक, लेझीम, बँडच्या गजरात रथयात्रा पुढे सरकर होती. समाधी स्मारक येथे शाहू महाराज यांना अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली. देवांग कोष्टी समाजाच्या संजय मकोटे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा करून शाहू महाराज यांना अभिवादन केले. याप्रसंगी समाजबांधव व भगिनी मोळय़ा संख्येने उपस्थित होत्या.

सत्यसुधारक समाज हॉटेल मुख्य आकर्षण

सिध्दार्थ नगरच्या कमिनीजवळ येथील शाहूप्रेमींनी गंगाराम कांबळे यांचे सत्यसुधारक समाज हॉटेल अप्रतिमरित्या साकारले होते. या हॉटेलमध्ये शाहू महाराज यांच्या वेशभूषेतील राकेश कांबळे  यांना गंगाराम कांबळे यांच्या भुमिकेतील चंद्रकांत बनगे चहा देतानाचा देखावा साकारला होता. तर अनिल माने, जीवन कांबळे, आदेश कांबळे हे गावकऱयांच्या भुमिकेत होते. या देखाव्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.

शाळांचा विशेष सहभाग

लोकराजा राजर्षी शाहू महाराज दिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवला. यामध्ये जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी प्रशालेच्या  विद्यार्थ्यांनी वारकऱयांची भुमिका व करवीर प्रशाला, राजर्षी शाहू विद्यामंदीर, शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, विक्रमनगर शाळेचे झांजपथक होते. उषाराजे गर्ल्स हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी नऊवारी साडी प्रदान केली होती. वीर कक्कय विद्यामंदीर, डॉ. जाकीर हुसेन विद्यामंदीर, उर्दू मराठी सरनाईक वसाहतच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभुषा केली होती. ल. कृ. जरग विद्यामंदिर, नेहरू हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, केएमसी कॉलेजचा चित्ररथ दींडीचे मुख्य आकर्षण ठरले. न्यू इंग्लीश मिडीयम स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विवेकानंद कॉलेजचे एनसीसी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नियोजनात सहभाग नोंदवला. 

महिला व युवतींचा विशेष सहभाग

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळय़ात महिला, युवती व युवकांचा विशेष सहभाग होता. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह जिल्हय़ातील अनेक महिलांनी भगव्या साडय़ा, तर सिध्दार्थनगर व राजारामपुरी मातंग वसाहत येथील महिलांनी पांढऱय़ा व निळय़ा साडय़ा आणि निळे फेटे परिधान केले होते. तर शाळा, महाविद्यालयातील मुलींनी नऊवारी साडी व कोल्हापुरी फेटे परिधान केले होते. हे या सोहळय़ाचे मुख्य आकर्षण ठरले.

Related Stories

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजी महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरणाची ऊर्जामंत्र्यांकडून दखल

Abhijeet Shinde

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुसऱ्या दिवशीही एकही कोरोना मृत्यू नाही

Abhijeet Shinde

कर्नाटकचा मुंबईवर हक्क हास्यास्पद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!