Tarun Bharat

सांस्कृतिक केंद्र दर्शनी भागात पडझड!

उद्घाटनापूर्वीच घडलेल्या प्रकाराने आश्चर्य

प्रतिनिधी/ चिपळूण

  गेली पंधरा वर्षे बंद असलेले व कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आलेल्या शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या किरकोळ वादळात केंद्राच्या प्रवेशद्वारावरील एक शीट गळून पडली आहे. सांस्कृतिक केंद्र अजूनही नगरपरिषदेच्या ताब्यात आलेले नसले तरी उद्घाटनापूर्वीच अशापध्दतीने झालेल्या पडझडीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

  पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या महापुरापासून बंद असलेले आणि त्यानतंर दुरूस्तीच्या फेऱयात अडकलेल्या सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम जवळपास पूर्णत्वास गेलेले आहे. किरकोळ काम बाकी असताना अभिनेते सुबोध भावे यांनी येथे येऊन केंद्राचे उद्घाटन करा, अन्यथा आपण ‘अश्रुंची झाली फुले’चा प्रयोग करून केंद्राचे आपण उद्घाटन करू, असे जाहीर केल्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडाली. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतःहून सांस्कृतिक केंद्राची पहाणी केली व सत्ताधारी व विरोधकांची बैठक घेऊन महिनाभरात सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करा आणि सांस्कृतिक केंद्र सुरू करा, अशी सूचना केली. त्यानंतर विरोधकांनी नगरपरिषदेच्या विशेष सभेत दुरूस्तीबाबत शंका व्यक्त केली होती.

 दरम्यान, सांस्कृतिक केंद्र सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता असताना लॉकडाऊन सुरू झाले आणि सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाचा विषयही लॉकडाऊन झाला. त्यातच 28 मार्च रोजी झालेल्या किरकोळ वादळात सांस्कृतिक केंद्राच्या दर्शनी भागाची शिट पडल्यानंतर या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. बुधवारी केंद्रातील दर्शनी भागातील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

 शिवसेना गंभीरपणे लक्ष घालणार

  केंद्र सुरू व्हावे, अशी आमची सातत्याने भावना राहिली आहे. परंतु सत्ताधाऱयांनी चुकीची आणि निकृष्ट दर्जाची कामे करायची आणि विरोधक काम करू देत नाहीत, सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करू देत नाहीत, अशी बोंबाबोंब करायची, हाच एकमेव कार्यक्रम सत्ताधाऱयांचा आहे. पडझड झाली त्यादिवशीच  मुख्याधिकाऱयांना याची कल्पना दिली. सर्वजण कोरोनाशी लढत असताना आपण तेव्हा जाहीरपणे आवाज उठवला नाही. परंतु पत्रव्यवहार तातडीने पालिकेशी केला आहे. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर या विषयात शिवसेना गंभीरपणे लक्ष घालणार असल्याचे, शिवसेना गटनेते उमेश सकपाळ यांनी सांगितले.

 केंद्राचे काम अजूनही सुरूच आहे : विधाते

 दरम्यान, सांस्कृतिक केंद्राचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. अनेक कामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या कामात काही पडझड झाली असली तरी तो कामकाजाचाच भाग असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

Related Stories

चिंदर येथे ग्रामस्थांना घरपोच धान्य वाटप

NIKHIL_N

जिमखाना मैदानावर उद्या क्रिकेटचा महासंग्राम

Anuja Kudatarkar

पर्यटकांची स्कूल बस चालकासह समुद्रात अडकली

Anuja Kudatarkar

अखेर चिपळूणकरांचे साखळी उपोषण स्थगित!

Patil_p

गणेश मूर्तीकारांसमोर आर्थिक पेच कायम

Anuja Kudatarkar

बंगाल उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Archana Banage