क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी चषक लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील साईराज हुबळी टायगर्स संघाने एक्सेस इलाईटचा 7 गडय़ांनी तर सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने अलोन स्पोर्ट्सचा 67 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्णव नुगानट्टी (साईराज), हर्ष पटेल (सुपर एक्स्प्रेस) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एक्सेस इलाईटने 22 षटकात 8 बाद 115 धावा केल्या. वृषभ पाटीलने 29, तेजस मुर्डेश्वरने 22, प्रभू शिलसट्टीने 20 तर पवन नागेशने 18 धावा केल्या. साईराज हुबळी टायगर्सतर्फे दर्शन मयेकरने 17 धावात 2, आकाश कुलकर्णीने 18 धावात 2, रोहन यारीसिमीने 23 धावात 2, सुजल कुलदेवर व सुजल पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर साईराज हुबळी टायगर्सने 17.1 षटकात 3 बाद 116 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात अर्णव नुगानट्टीने 8 चौकारासह 54, केदार ऊसुलकरने 25, रोहन यारिसिमीने नाबाद 10 धावा केल्या. एक्सेस इलाईटतर्फे तेजस मुर्डेश्वर, अभिषेक बालीकाई, सिद्धांत कदम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सने 25 षटकात 8 बाद 126 धावा केल्या. त्यात आकाश असलकरने 4 चौकारासह 30, सिद्धेश असलकरने 28, कावीश मुक्कण्णावरने 24, ऋषील दोरकाडीने 13 धावा केल्या. अलोन स्पोर्ट्सतर्फे यश हावळाण्णाचेने 15 धावात 3, ओमकार देशपांडेने 25 धावात 2 तर सिद्धार्थ हुल्लोळी, मानस एम. एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अलोन स्पोर्ट्सचा डाव 18 षटकात 59 धावात आटोपला. एकवेळ 4 बाद 13 अशी नाजुक स्थिती अलोन स्पोर्ट्सची झाली होती. डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष पटेलने 5 षटकात 6 धावा देवून 5 गडी बाद केले. अलोनतर्फे आदित्य हिरेमठने 22 तर ऋषिकेश पाटीलने 11 धावा केल्या. सुपर एक्स्प्रेसतर्फे ध्रुव देसाईने 12 धावात 2, आकाश असलकरने 16 धावात 2 तर सिद्धेश असलकरने 1 गडी बाद करत हर्ष पटेलला सुरेख साथ दिली. या सामन्यात सर्व 10 गडी फिरकी गोलांदाजानी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रजनी प्रकाश पाटील, नंदा कल्लूर, नागेश एम., सचिन राजपूत यांच्याहस्ते अर्णव नुगानट्टीला तर सौ. कनक पटेल, प्रशांत लायंदर, यतेंद्र देशपांडे, परशराम पाटील यांच्या हस्ते हर्ष पटेलला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बुधवारी साईराज हुबळी टायगर्स वि. सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स यांच्यात सकाळी 10 वा. अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.
समालोचक प्रमोद जपे यांचा गौरव


बेळगावचे हिंदी समालोचक प्रमोद जपे यांना एक्सेस बिल्डर डेव्हलपर्सच्या प्रकाश पाटील यांनी, उत्कृष्ट समालोचन केल्याबद्दल 5 हजार रूपये तर सुपर एक्स्प्रेसचे संचालक विठ्ठल गवस यांनी 1500 रूपये देऊन त्यांचा खास गौरव केला.