Tarun Bharat

साखरेच्या जिल्हय़ातील ऊसही डोंगा अन् रसही डोंगा!

काँग्रेस-निजद सरकारच्या पतनाला बेळगाव जिल्हय़ातील राजकीय घडामोडी कारणीभूत ठरल्या. आताही बेळगाव जिल्हय़ातील असंतोषामुळे नेतृत्वबदलाची चर्चा घडताना दिसत आहे.

राज्यात कोरोना बाधितांच्या आकडय़ाने एक लाखाची संख्या पार केली आहे. रोज कमीत कमी पाच हजाराहून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. तर शंभरहून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. बेळगाव जिल्हय़ातही तीन हजाराचा आकडा पार झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची मागणी वाढली आहे. त्याचवेळेला केंद्र सरकारने अनलॉक-3 ची नियमावली जाहीर केली आहे. रात्रीचा कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. व्यायाम शाळा, योगा केंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शाळा-कॉलेज मात्र ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. चित्रपटगृहे, स्वीमिंगपूल, बार, सामाजिक-धार्मिक, राजकीय कार्यक्रमावरील बंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार आणखी एक महिना शिक्षण संस्था बंद असणार आहेत. ऑगस्टमधील परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे कर्नाटकातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजप, काँग्रेस, निजद या तिन्ही पक्षातील हालचाली वाढल्या आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाचे प्रयत्न सुरू असल्याचे चर्चिले जात आहे. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे गेले तीन दिवस नवी दिल्लीत तळ ठोकून होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना महाराष्ट्राचे राज्यपालपद देऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या खांद्यावर कर्नाटकाचे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ व बी. एल. संतोष यांची नावेही मुख्यमंत्रीपदासाठी ठळक चर्चेत आहेत. चार दिवसांपूर्वी येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी पूर्ण केला आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्री बदलाची चर्चाही सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी महामंडळांवर नियुक्त्या जाहीर केल्या. मंत्रिमंडळ विस्तारावेळी अडथळे नको म्हणून आधीच नियुक्त्या उरकण्यात आल्या होत्या. मात्र, काही आमदारांनी आम्ही महामंडळ अध्यक्षपदासाठी इच्छुक नव्हतो. दिले तर मंत्रिपद द्या, नाही तर काहीच नको अशी भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत असंतोषावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कसरत सुरू झाली आहे. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमादिवशी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी नवी दिल्लीत होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन ते चर्चा करीत होते. पुढची तीन वर्षे येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री असणार आहेत, असे सांगत नेतृत्व बदलासंबंधीची चर्चा केवळ अफवा असल्याचे लक्ष्मण सवदी यांनी सांगितले असले तरी भाजपमध्ये गेल्या आठवडाभरापासून राजकीय हालचाली व कुरघोडय़ा सुरू झाल्या आहेत, हे नक्की आहे. दक्षिणेत पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकविण्याचा मान येडियुराप्पा यांना मिळाला आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे कर्नाटकात भाजप सत्तेवर आला. जातीय समीकरणेही याला कारणीभूत आहेत. आता नेतृत्वबदल झालाच तर राजकीय अस्थिरता वाढणार, हे निश्चित आहे. कारण येडियुराप्पा यांना मानणारा एक मोठा वर्ग दुखावला जाणार आहे.

भाजप हायकमांडलाही याची कल्पना आहे. त्यामुळेच महाराष्ट्र किंवा एखाद्या मोठय़ा राज्याच्या राज्यपालपदी येडियुराप्पा यांची वर्णी लावून बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देऊन बंडाळी थोपविण्याचा विचार सुरू असला तरी या प्रयत्नांना कितपत यश येणार आहे हे सध्या सांगता येणार नाही. काँग्रेस-निजद सरकारच्या पतनाला बेळगाव जिल्हय़ातील राजकीय घडामोडी कारणीभूत ठरल्या. आताही बेळगाव जिल्हय़ातील असंतोषामुळे नेतृत्व बदलाची चर्चा घडताना दिसत आहे. जर येडियुराप्पा यांना बदलण्याचा निर्णय झाला तर भाजपमध्ये पक्षांतर्गत बंडाळी वाढणार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा काँग्रेस-निजदचा प्रयोग करायचा का हाही विचार सुरू आहे. यासंबंधी चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मात्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व त्यांचे एकेकाळचे मित्र डी. के. शिवकुमार यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. रामनगरमध्ये शिवकुमार व त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांच्यामुळे आपल्या पक्षाला खडतर स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या भावाला पुढे करून शिवकुमार त्रास देत आहेत, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

दुसरीकडे काँग्रेस-निजद युती सरकारचा पाडाव करण्यासाठी साहाय्यभूत ठरलेले सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपद देण्यासाठी भाजपमध्ये विचार सुरू आहे. याच वेळेला भाजपला योगेश्वर कंटाळले आहेत. कोणत्याही क्षणी भाजप सरकार कोसळणार आहे. आपण भाजपमध्ये येऊन चूक केली. पुन्हा आपल्याला काँग्रेसमध्ये घ्या, अशी विनवणी योगेश्वर यांनी आपल्याकडे केली आहे, असा गौप्यस्फोट डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. बी. एस. येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री रहावेत, अशी इच्छा डी. के. शिवकुमार व एच. डी. कुमारस्वामी यांच्या मनात आहे, अशा शब्दात सी. पी. योगेश्वर यांनी या दोन्ही नेत्यांवर पलटवार केला आहे. एकीकडे भाजपमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस-निजद नेतेही या राजकीय घडामोडींचा कानोसा घेत आपल्या पथ्यावर काही पडते का, याची चाचपणी करीत आहेत. गेल्या आठवडय़ात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. राजकीय वर्तुळात या चर्चेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. जर प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती झाली तर रमेश जारकीहोळी यांनी आपली भूमिका बदलण्याची गरज नाही. हा संदेश देण्यासाठी या दोन्ही नेत्यांची भेट झाली असावी, अशी चर्चा सुरू आहे. युती सरकारचा पाडाव करून कर्नाटकात भाजपची सत्ता यावी यासाठी रमेश जारकीहोळी यांनी घेतलेली ताठर भूमिका कारणीभूत ठरली होती. जर नेतृत्वबदल झाल्यास त्यांना अस्थिरता जाणवू नये. अन्य पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना असुरक्षितता जाणवू नये, या पार्श्वभूमीवर हायकमांडने या नेत्यांना संदेश दिल्याचीही चर्चा सुरू आहे. कोरोनाचा कहर जसा वाढत चालला आहे तशा राजकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत.

Related Stories

बंगालचे रणांगण

Patil_p

गुणांच्या संगतीने गुणांच्या पलीकडे असलेला आत्माही गुणकर्मामध्ये वागू लागतो

Patil_p

सावित्रीच्या लेकींची आरोग्य साक्षरता वाढण्याची गरज

Patil_p

बॉलीवूडच्या पलीकडचे सिनेमाविश्व…

Patil_p

जन्म आणि नाती…

Patil_p

हिजाब : शिमगा संपला तरी कवित्व शिल्लक

Amit Kulkarni
error: Content is protected !!