रात्री श्रीकृष्ण मिरवणूक. वाळवंटीत दिपदान. विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात नौका दाखल.


डिचोली/प्रतिनिधी
विठ्ठलापूर साखळीतील श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी वाळवंटी नदीकिनारी होणाऱया राज्यस्तरीय त्रिपुरारी उत्सव व नौकानयन स्पर्धेला रात्री मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. रात्री विठ्ठलापूर परिसरात श्रीकृष्ण मिरवणूक काढण्यात आली. तर वाळवंटी नदीपात्रात दिपदान करण्यात आले. तसेच या उत्सवाचे आकर्षण असलेल्या नौकानयन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आकर्षक नौका दाखल झाल्या होत्या.
विठ्ठलापूर साखळीतील दिपावली उत्सव समिती, गोवा राज्य कला व संस्कृती खाते व पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमेला थाटात प्रारंभ झाला. संध्याकाळी मोठय़ा संख्येने स्थानिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. रात्री साडेसातच्या सुमारास विठ्ठल रखुमाई मंदिराकडून श्रीकृष्ण मिरवणुकीला प्रारंभ झाला. हि मिरवणूक विठ्ठलापूर भागात फिरल्यानंतर तिचे वाळवंटी नदीकिनारी आगमन झाले. नदीच्या मध्याभागी श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान करण्यात आली.
त्यानंतर स्थानिक सुवासिनींकडून वाळवंटी नदीपात्रात दिप सोडण्यात आले. या उत्सवाचे खास आकर्षक असलेल्या नौकानयन स्पर्धेसाठी मंदिर परिसरात आकर्षक नौका दाखल झालेल्या होत्या. नौकांसमवेत असलेले कलाकार नौका जोडण्याच्या तसेच त्यात विद्यूत रोषणाईच्या कार्यात व्यस्त होते. दोन वर्षांच्या खंडानंतर होणाऱया या उत्सवात आणि नौकानयन स्पर्धेत मोठय़ा संख्येने नौकांनी सहभाग घेतला होता. रात्री या नौका वाळवंटी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्यानंतर वाळवंटीचे पात्र नौकांमधील विद्यूत रोषणाईने खुलून गेले होते.
श्रीकृष्ण मिरवणूक व दिपदानानंतर मंदिराच्या प्रांगणात अलंकारतर्फे रसिकजन हा गीत व नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिकांची चांगली उपस्थिती होती. रात्री 10.30 वा. श्रींची पालखी वाजत गाजत वाळवंटी नदीकिनारी नेण्यात आली. त्यानंतर नौकाविहाराला प्रारंभ झाला. त्रिपुरासुराचा वध होताच सरंगे आकाशात सोडण्यात आले. या उत्सवानिमित्त मंदिराच्या डाव्या बाजूने माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे लावण्यात आलेल्या स्वतंत्रसैनिकांच्या फोटो प्रदर्शनाचा अनेकांनी लाभ घेत माहिती मिळवून घेतली.