6 हजार फूटांच्या शिखरावर केली चढाई 40 वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची केली पूर्तता
वाढते वय तुम्हाला कमजोर आणि मंदावत असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास एका 62 वर्षीय आजींचे रोप क्लायम्बिंग अवश्य जाणून घ्यावे. बेंगळूरच्या या महिलेचा निर्धार वय केवळ एक आकडा असल्याचा पुरावा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील अत्यंत उंच आणि ट्रेकिंगसाठी सर्वात अवघड शिखरांपैकी एक अगस्त्याकुंडमवर या महिलेने चढाई केली आहे.


या महिलेचे नाव नागरत्नाम्मा असून त्यांनी 16 फेब्रुवारी रोजी साडी नेसलेल्या स्थितीत या शिखरावर रोप क्लायम्बिंग केले आहे. त्या स्वतःचा मुलगा आणि त्याच्या मित्रांसोबत बेंगळूरमधून येथे पोहोचल्या होत्या. नागरत्नाम्मा यांचा हा कर्नाटकबाहेरील पहिलाच प्रवास होता. अगस्त्यारकुडम हे केरळमधील दुसरे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1,868 मीटर (6,129 फूट) इतकी आहे.
माझ्या विवाहाला 40 वर्षे झाली आहेत. या वर्षांमध्ये मी कौटुंबिक जबाबदार पार पाडण्यात गुंतून केले होते. परंतु आता माझी मुले मोठी झाली असून स्वतःच्या पायांवर उभी आहेत. अशा स्थितीत मी आता माझ्या स्वप्नांची पूर्तता करू शकते असे त्यांनी म्हटले आहे.
इतरांना करत आहेत प्रेरित
नागरत्नाम्मा यांच्या रोप क्लायम्बिंगचा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात त्या साडीमध्ये दोरखंडाच्या मदतीने शिखरावर चढत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर त्यांचे मोठय़ा प्रमाणावर कौतुक होत असून त्यांच्याकडून लोक प्रेरित देखील होत आहेत.