क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव


प्रितम बारीची भेदक गोलंदाजी व अभिषेक अंगानेची आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर मोहन मोरे संघाने अलोन मुंबई संघाचा 2 गडय़ांनी पराभव करून सातवा साईराज चषक पटकाविला. मालिकावीरचा मानकरी प्रितम बारीला दुचाकी वाहनाचे बक्षीस बहाल करण्यात आले.


साईराज चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पीएसआय विनायक बडिगेर, राजेश जाधव, सतीश गोटाडगी, जॅकी मस्करनेस, महेश फगरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. दोन वर्षापूर्वी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले होते. त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. नाणेफेक मोहन मोरे संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले.
हा सामना दोन डावाचा खेळविण्यात आला. पहिल्या डावात अलोन मुंबईने 12 षटकात 5 बाद 121 धावा केल्या. त्यात कृष्णा सातपुतेने 5 षटकारासह 44, अख्तर शेखने 25, आकाश तारेकरने 15, मंदारने 12, प्रथमेश पवारने 11 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे अक्षय गरतने 22 धावात 2 तर प्रितम बारी, अनिकेत राऊत, प्रज्योत अंबिरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 12 षटकात 7 बाद 149 धावा करून पहिल्या डावात 28 धावांची आघाडी मिळविली. त्यात अभिषेक अंगानेने 3 षटकार, 5 चौकारासह 48, अनिकेत राऊतने 34, श्रेयस कदमने 29, प्रितम बारीने 2 षटकार, 1 चौकारासह 23 धावा केल्या. अलोनतर्फे राहिल शेख व मुस्तकीन यांनी प्रत्येकी 3 तर अजय सरोजने 1 गडी बाद केला. दुसऱया डावात अलोन स्पोर्ट्स संघाने 12 षटकात 9 बाद 110 धावा जमविल्याने मोहन मोरे संघाला 83 धावांचे आव्हान मिळाले. अलोनतर्फे प्रथमेश पवारने 4 षटकार, 2 चौकारासह 41, आकाश तारेकरने 18, राहिल शेखने 12 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रितम बारीने 10 धावात 5 गडी बाद करत निम्मा संघ गारद केला. त्याला प्रज्योत अंबिरे व अक्षय यांनी प्रत्येकी 2 तर सुहास पोवारने 1 गडी बाद करीत चांगली साथ दिली. त्यानंतर मोहन मोरे संघाने 10.3 षटकात 8 बाद 87 धावा करून सामना दोन गडय़ानी जिंकला. त्यात अभिषेक अंगानेने 23, अनंत वाघ व जयेश यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. अलोनतर्फे मुस्तकीन व रवी भुंबार यांनी प्रत्येकी 3 तर अजय सरोजने 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पीएसआय विनायक बडिगेर, मल्लिकार्जुन जगजंपी, अक्षय जगजंपी, राजेश जाधव, नारायण फगरे, शितल वेसने, जॅकी मस्करनेस, मोहन मोरे, अमित पाटील, गजानन धामणेकर, महेश फगरे, विजय जाधव, रोहित देसाई, अमर नाईक, अमर सरदेसाई, शरद पाटील, महेश पाटील, गजानन फगरे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मोहन मोरे संघाला 1,21,111 तर उपविजेत्या अलोन स्पोर्ट्सला 66,000 व गजानन फगरे यांनी पुरस्कृत केलेला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सामनावीर अभिषेक अंगाने (मोहन मोरे), उत्कृष्ट फलंदाज कृष्णा सातपुते (अलोन), उत्कृष्ट गोलंदाज प्रज्योत अंबिरे (मोहन मोरे), उत्कृष्ट यष्टीरक्षक अनंत वाघ, उत्कृष्ट संघ श्री गणेश इलेव्हन हिंडलगा, इम्पॅक्ट खेळाडू सादीक तिगडी (एचसीव्ही), स्पर्धेतील उत्कृष्ट झेल अजिम टेलर (युपी) यांना चषक व रोख 5,000 देऊन गौरविण्यात आले तर मालिकावीर प्रितम बारी याला जगजंपी बजाजकडून पुरस्कृत केलेले दुचाकी वाहन मल्लिकार्जुन जगजंपी यांच्याकडून देऊन गौरविण्यात आले. तर मालिकावीर प्रितम बारी याला जगजंपी बजाजकडून पुरस्कृत केलेले दुचाकी वाहन मल्लिकार्जुन जगजंपी यांच्याकडून देऊन गौरविण्यात आले
अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून सनिल पाटील, सचिन सांगेकर, अनंत माळवी तर स्कोअरर म्हणून विकी यांनी काम पाहिले. सामन्याचे समालोचन नासीर पठण, उमेश मजुकर, आरिफ बाळेकुंद्री, मोहन वाळवेकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराज स्पोर्ट्च्या सर्व पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.