Tarun Bharat

सातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी माणकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

वार्ताहर/ औंध

सांगली जिह्याच्या क्रीडाक्षेत्रात थैमान घातलेल्या बनावट प्रमाणपत्राच्या संसर्गाचे लोण सातारपर्यंत येऊन पोहोचले आहे. नोकरीसाठी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याने निखिल माळी रा. गोडुली जि.सातारा या तरुणावर प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांनी माणकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सातारच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

  खेळाडू करीता असलेल्या राखीव कोटय़ातून प्रमाणपत्र सादर करून अनेक खेळाडू नोकरी मिळवतात. आरक्षणातून भरती झालेल्या खेळाडूच्या प्रमाणपत्राची क्रीडा विभागामार्फत पडताळणी करून नियुक्ती दिली जाते. शासनाच्या क्रीडा विभागामार्फत घेतलेल्या स्पर्धेत पारदर्शकता दिसून येत असली तरी क्रीडा संघटनेच्या पातळीवर घेण्यात येणाऱया विविध स्पर्धेत गोलमाल होत असल्याचे अलीकडे उघडकीला आलेल्या घटनेतून सिध्द झाले आहे. त्यामुळे क्रीडा संघटनेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अर्थात क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्रांचा होणारा बाजार नवीन नाही. मात्र उघडकीस येत नाही, तोपर्यंत अनेक दलालांनी आपले आर्थिक उखळ पांढरे करून घेतले आहे.

 गोडुली जि सातारा येथील निखिल माळी नावाच्या तरुणाने भरतीसाठी सादर केलेले प्रमाणपत्राबद्दल संशय वाटल्याने त्याची पडताळणी करण्यात आली.   पडताळणीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर 2011 साली मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रँपोलिन जिम्नँस्टिक स्पर्धेचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक खेळाडू सहभागी झाले नसताना देखील जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱयांना अंधारात ठेवून राज्यस्तरावरील पदाधिकारी गोलमाल करतात. यासाठी काही दलाल सावज शोधत असतात. बनावट प्रमाणपत्र प्रकरणी मोठी सौदेबाजी होत असते मात्र नोकरीच्या अमिषाने अनेक तरुण या मोहाला बळी पडतात. परंतु भरतीप्रक्रीयेत पडताळणीत अशा बनावटगिरी करणाऱयांचे पितळ उघडे पडते.

 गेल्या आठवडय़ात सांगली जिह्यात ट्रेम्पोलिनचेच बनावट प्रमाणपत्राबद्दल कोल्हापूरला गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक मासे गळाला लागले होते. याची यथावकाश चौकशी होईलही मात्र सांगलीतील बनावटगिरीचे लोण आता सातारपर्यंत येऊन धडकल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रडारवरील अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. क्रीडा विभागाने वरवर तपास न करता प्रकरणाच्या मूळाशी जाऊन त्याची पाळेमुळे खोदून काढणे गरजेचे आहे. बनावटगिरी करून आर्थिक उखळ पांढरे करून घेणाऱया क्रीडा संघटनेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी देखील क्रीडा क्षेत्रातून होत आहे.

Related Stories

बलात्कार प्रकरणी एकास दहा वर्षांचा तुरूंगवास

Patil_p

दृष्टीहिन महिला 40 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण

Patil_p

शेतकरी आंदोलनावरून RSS ने भाजपला फटकारले

Archana Banage

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षपदी सविता म्हेत्रे यांची निवड

Patil_p

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा; उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

Archana Banage

मान्सूनपूर्व पावसाने सातारकर ओलेचिंब

Patil_p