Tarun Bharat

सातारा उपकेंद्रात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

Advertisements

– खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती : -शिवाजी विद्यापीठाची घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या सातारा येथील उपकेंद्रात तेथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता आणि पर्यटन याला अनुसरून अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. तसेच काळानुसार कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम तयार करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. शिवाजी विद्यापीठात कुलगुरूंबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विद्यापीठात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सातारा येथील उपकेंद्राबाबत चर्चा झाली. दरम्यान कुलगुरूंच्या हस्ते खासदार भोसले यांचा सत्कार करण्यात आला. खासदार भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साताऱयातील विद्यापीठाचे उपकेंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, अभियांत्रिकीच्या आंतरविद्याशाखीय शाखा असे अनेक नवे अभ्यासक्रम येत आहेत. गावाकडून शहरांकडे होणारे विद्यार्थ्यांचे, कामगारांचे स्थलांतर रोखून त्यांना स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपकेंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार उपकेंद्रात सोयी-सुविधा उपलब्ध करून आदर्श शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा मानस आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

विद्यापीठातील बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची उपकेंद्रे उभारताना `आणखी एक महाविद्यालय अगर विद्यापीठाचे विस्तारित स्वरुप’ अभिप्रेत नसून स्थानिक संसाधने, तेथील भौगोलिक वैशिष्टÎे यांचा समावेश करून त्यांची नव्या शैक्षणिक धोरणाशी सांगड घालून, रोजगाराभिमुख समृद्ध बनविणारे अभ्यासक्रम अपेक्षित आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, प्रवास व पर्यटन, औषधनिर्माण, व्यवस्थापन आणि अन्नविज्ञान व तंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमांची सुरवात करण्यासाठीही उपकेंद्रे उपयुक्त ठरतील. शिक्षणाबरोबरच संशोधन व कौशल्य विकास आणि अन्य समाजाभिमुख उपक्रम यांसाठीही उपकेंद्र उपयुक्त ठरतील. व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी उपकेंद्राची माहिती दिली. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी अधिसभा सदस्य डी. जी. बनकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव वैभव ढेरे उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापुरात फुटबॉल खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी सुरू

Sumit Tambekar

साताऱयात मटक्यावर कारवाईत 57 जण ताब्यात

Patil_p

सातारा तालुका पोलिसांचे वाहतूक शाखेकडून कौतुक

Abhijeet Shinde

वनविभागाकडून गव्याची शोध मोहीम सुरु

Sumit Tambekar

कोल्हापुरकरांचा विकेंड लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशी ही प्रतिसाद

Abhijeet Shinde

दातृत्वाचे हात सरसावले… पाणी टंचाईतही `वडणगे पॅटर्न’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!