डोंगर पठारावरील पिरेवाडी गावातील घटना
प्रतिनिधी / नागठाणे
वन्य प्राण्यांकडून पिकांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या शिवारातील वन्यप्राणी धुडकवण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी (भैरवगड) ता.सातारा येथील युवकाला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी देत त्याच्या कुटुंबाकडून हजारो रुपये उकळण्याचा प्रकार घडला.याप्रकरणी पीडित युवक ओंकार शामराव शिंदे ( रा.पिरेवाडी- भैरवगड,ता.सातारा ) व ग्रामस्थांनी वनविभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला आहे.वनविभागाचे अधिकारी गावित, कर्मचारी महेश सोनवले, अमोल गायकवाड ( सोन्या )व अन्य साथीदारांविरुद्ध हा तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
तक्रार अर्जात त्याने म्हटले आहे की सोमवार दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी येथील ओंकार शिंदे हा त्याच्या शिवारात पिकांची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांना धुडकवायला गेला होता.यावेळी या भागात कार्यरत असलेल्या वनविभागाचे अधिकारी गावित व कर्मचारी महेश सोनवले व त्यांच्या काही साथीदारांनी त्याला पकडले.यावेळी त्यांनी ओंकार शिंदेला ‘तू शिकार करतोस.तुझ्यावर गुन्हा दाखल करतो.तुझे करिअर खराब करतो’ अशी धमकी दिली.
त्यानंतर वनाधिकारी गावित यांनी ओंकार शिंदेला कारमध्ये बसवून खिंडवाडी (ता.सातारा) येथील अप्रतिम लॉजवर नेले.तेथे त्याला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून गावातील काही लोकांची नावे घेतली.तसेच त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.
दरम्यान याच वेळी वनकर्मचारी महेश सोनवले व त्यांच्या साथीदारांनी ओंकारच्या वडिलांना सोनापूर येथे बोलावून घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली.शेवटी तीस हजार रुपये द्यावेच लागतील असे म्हणत वडिलांना खिंडवाडी येथे अप्रतिम लॉजवर नेले.रात्री उशिरा १ वाजता या सर्वांनी ओंकार शिंदे यांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना दुसऱ्या दिवशी तीस हजार रुपये घेऊन येण्यास सांगून जर पैसे आणले नाही तर तुम्हाला उचलून नेऊ अशी धमकी देऊन सोडून दिले.
मंगळवार दि.१ सप्टेंबर रोजी घाबरलेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी गावातील लोकांकडुन पैसे जमा केले.तर काही रक्कम भाऊ राजेंद्र शिंदे यांनी दिली.जमा झालेले सुमारे २५ हजार रूपये घेऊन संबंधीत युवकाचे वडील व भाऊ राजेंद्र शिंदे हे खिंडवाडी येथे अप्रतिम लॉजवर दुपारी गेले.तेथे वनाधिकारी गावित व महेश सोनवले आधीच येऊन थांबले होते.यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अमोल गायकवाड (सोन्या) याला बाहेर पाठवून राजेंद्र शिंदे यांच्याकडे तीस हजार रुपये मागितले. मात्र पंचवीस हजार रुपयांचीच जुळणी झाल्याचे सांगून ते पैसे अमोल गायकवाड याच्याकडे दिले.त्याने ते पैसे लॉजमध्ये थांबलेल्या वनाधिकारी गावित व महेश सोनवले यांना दिले.त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल परत दिला व सह्या घेतलेले व हाताचे ठसे घेतलेले कोरे कागद आम्ही फाडून टाकतो.तुझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे सांगितले.
तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर व त्यांच्या साथीदारांवर त्वरित कारवाई करून न्याय द्यावा असे शेवटी ओंकार शिंदे याने उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांना शुक्रवारी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.


previous post