Tarun Bharat

सातारा जिल्ह्यात संसर्गचा विस्फोट थांबला, तरीही काळजी आवश्यकच

सातारा / प्रतिनिधी
कोरोनाचा कहर वाढला तेव्हा भीती वाढल्याने लोक घराबाहेर पडणे टाळत होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिने अक्षरशः भीतीच्या छायेखाली गेले. एकीकडे पावसाचा धुमाकूळ अन कोरोनाचा विस्फोट गेल्या दोन महिन्यात नागरिकांनी अनुभवला. जी विस्फोटक स्थिती निर्माण झाली होती ती थांबली. सध्या बाधित वाढीचा वेग मंदावला असला तरी अद्यापही संसर्ग थांबलेला नाही. त्यामुळे मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर करत काळजी घेणे आवश्यकच आहे. पुढील वर्षाच्या आरंभी लस येण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवलीय. त्याचे वितरण करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे काम सुरु असून पुढील काही महिने तरी युध्दाचेच आहेत.

दरम्यान, दिवसभरात जम्बो हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड 14 व आयसीयु बेड 6 असे नवीन 20 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून तिथे उपचारार्थ रुग्णांची संख्या 43 झाली आहे. तर मंगळवारी मृत्यूदर खाली घसरल्याने दिलासा मिळाला असून 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात 242 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर रात्री उशिरा अहवालात 354 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

‘सवयभान’ सोडू नका’ : राजेंद्र चोरगे
कोरोना सुरु झाल्यापासून साताऱयात सवयभान, मीच माझ्या सातारकरांचा रक्षक या चळवळीने केलेले काम राज्याला दिशादर्शक ठरलेय. मात्र, कोरोनाचा वेग मंदावत असताना अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरु झाल्यात. पण मार्केट, मंडई परिसरात नागरिकांची बेशिस्त वाढली आहे. जोपर्यंत संसर्ग पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत सवयभान चळवळ सुरुच राहणार आहे. अद्याप धोका संपलेला नाही. लढाई सुरुच असून ही अंतिम टप्प्यातील लढाई जिंकण्यासाठी सातारकरांनी सवयभान सोडू नये. मास्क, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर केलाच पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस- डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी करोनाच्या लशीबाबत मंत्रिगटाला माहिती दिली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला एकापेक्षा अधिक लशी उपलब्ध होऊ शकतील. विशेषज्ञ लशीच्या वितरणाची योजना तयार करत आहेत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. कोरोना विषाणूवरील लस 2020 च्या शेवटापर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध होईल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांकडून डेटा गोळा करत असून त्याचा उपयोग लशीच्या योग्य वितरणासाठी होणार आहे.

सातारा व कराड तालुक्यात वाढ सुरुच
सातारा व कराडसह कोरेगाव, फलटण, खटाव येथे दोन अंकी संख्येने वाढ सुरु असतानाच वाई, पाटण, खंडाळा, माण, महाबळेश्वर एक अंकी संख्येने बाधित समोर आले. सोमवारी रात्रीच्या अहवालात जावली तालुक्यात एकही नवा रुग्ण समोर न आल्याने जावलीची वाटचाल कोरोनामुक्ती सुरु झाली आहे. मृत्यूदराचा आलेखही खाली घसरलाय. मात्र, सातारा व कराड तालुक्यात वेग मंदावलाय मात्र बाधित वाढ सुरुच असल्याने तिथे नागरिकांसह प्रशासनाने ठोस उपाय योजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

सातारा, कराडमध्ये जास्त मृत्यू
कोरोना संसर्गात कराड हॉटस्पॉट ठरले असले तरी तिथे बळींची संख्या 288 आहे. मात्र कराडमध्ये वेग मंदावत असताना त्यानंतर सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट झाले असून जिल्हय़ात सर्वात जास्त 10,036 एवढे बाधित एकटय़ा सातारा तालुक्यात असून बळींची संख्या 336 एवढी मोठी आहे. खटाव 119, कोरेगाव 109, फलटण 109 व वाई 100 तर जावली 52, खंडाळा 54, माण 61, पाटण 85 अशी तालुकानिहाय बाधितांच्या बळींची संख्या आहे. एकूण बळींची संख्या 1,381 असून गेल्या दोन दिवसात बळींचे आकडे कमी येवू लागल्याचा दिलासा परिस्थिती देवू लागलीय.

आता परिस्थितीवर नियंत्रण आलेय
जिल्हय़ात जम्बो हॉस्पिटल सुरु झालेय. 75 टक्के बाधित नागरिक होम आयसोलेशनमध्ये बरे होवू लागलेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झालाय तर रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबून पुरवठाही व्यवस्थित सुरु झालाय. मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान प्रशासनाने स्वीकारले असून बाधितांचा वेग मंदावल्याने आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाव आहे. नागरिकांनी देखील स्वतःबरोबर कुटुंबाची पर्यायाने समाजाची काळजी घेत दक्ष राहून संसर्ग रोखण्याच्या लढाईत योगदान दिले पाहिजे. न घाबरता कोरोनाला हरवले पाहिजे.

जिल्हय़ातील 7 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या एकंबे ता. कराड 75 वर्षीय पुरुष, कोंडवे ता. सातारा 48 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. सातारा 70 वर्षीय महिला तसेच जिह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा 61 वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ ता. फलटण 42 वर्षीय महिला, जांब ता. खटाव 78 वर्षीय पुरुष, हिंगणी ता. माण 80 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

471 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 64, कराड 11, फलटण येथील 57, कोरेगाव 67, खंडाळा 35, रायगाव 30, पानमळेवाडी 48, मायणी 20, महाबळेश्वर 5, दहिवडी 15, खावली 9, म्हसवड 21, पिंपोडा 7 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 82 असे एकूण 471 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,64,293
एकूण बाधित 42,430
एकूण कोरोनामुक्त 34,113
मृत्यू 1,381
उपचारार्थ रुग्ण 6,836
जम्बो हॉस्पिटलमध्ये 43

मंगळवारी
एकूण बाधित 354
एकूण मुक्त 242
एकूण बळी 07

Related Stories

सातारा : अपघातावरून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

साताऱ्यात परप्रांतीयांना लुटणारे तिघे जेरबंद

Archana Banage

मानसोपचार तज्ञ नसल्याने मनोरुग्णांची फरफट

Patil_p

सातारा : फेक अकाऊंटवरुन लग्नासाठी धमकी

datta jadhav

वेग मंदावतोय; जिल्हय़ात 1394 बाधित

Patil_p

सातारा : बनावट सोने प्रकरण; आठ परप्रांतीयांची टोळी जेरबंद

datta jadhav
error: Content is protected !!