Tarun Bharat

सातारा : पर्यटन व इनडोअर गेम आजपासून सुरू

8,908 नागरिक होम आयसोलेट, मंगळवारी रात्री 271 बाधित
97 जणांची कोरोनावर मात, जिल्ह्यात 11 बाधितांचा मृत्यू
दुर्गोत्सवावर कोरोनाचे सावट

प्रतिनिधी / सातारा

कोरोना संसर्ग मंदावला असला तरी अद्यापही सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, फलटण या तालुक्यात कमी संख्येने पण रुग्ण वाढ सुरुच आहे. रुग्ण वाढ 200 च्या पटीत सुरु असली तरी कोरोनामुक्तीचा वेग चांगला वाढलाय. मात्र, मंगळवारी सायंकाळच्या फक्त 92 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. बेडसाठीची पळापळ थांबली असून सध्या जिल्ह्यात 8 हजार 908 लक्षणे नसलेले पण बाधित नागरिक होम आयसोलेट आहेत. कोरोनामुक्तीची टक्केवारी 85 टक्केंच्या वर गेली असून या दिलासा व थोडी भीती अशा वातावरणात नागरिक दुर्गोत्सव साजरा करत आहेत. तर महाबळेश्वर, पाचगणीत काही बाबींना परवानगी देण्यात आल्याने पर्यटनस्थळे आजपासून सुरू होत आहेत.

दरम्यान, गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या 11 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना बळींची संख्या 1,449 एवढी झालीय. तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 271 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.

पर्यटन स्थळे, इनडोअर गेम सुरु होणार
महाबळेश्वर, पाचगणी, बामणोली ही पर्यटन स्थळे बुधवारपासून मास्क, स्वच्छता व सुरक्षित अंतर पाळून व प्रशासनाचे नियम पाळून सुरु होत आहेत. यामध्ये घोडेसवारी, नौकानयन सुरु होत असले तरी तिथे पर्यटकांची नोंद ठेवण्यापासून त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यापासून अनेक गोष्टींची नियमावली आहे. त्याबाबत प्रशासनाने पर्यटन स्थळी तसेच इनडोअर गेम सुरु असल्याने त्या ठिकाणी घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन केलेले आहे.

सातारा, कराडमध्ये आकड्यांचे हेलकावे
सध्या मोठ्या संख्येने बाधित येण्याचे प्रमाण मंदावलेय. मात्र 200 च्या पटीत रुग्ण वाढतच आहेत. यामध्ये सातारा तालुका हॉटस्पॉट ठरला असून कराडात वेग मंदावत असताना रविवारी फक्त 5 नवे रुग्ण समोर आले होते. मात्र सोमवारी रात्रीच्या अहवालात 44 बाधितांचा आकडा समोर आला. फलटण, कोरेगाव, खटावमध्ये देखील दोन आकडी संख्येने रुग्ण आढळून येत असून वेग मंदावला तरी आकड्यांचे हेलकावे कमी जास्त प्रमाणात सुरुच आहेत.

दुर्गोत्सवावर कोरोनाचे सावट
रासदांडिया, महाआरती, दुर्गादौड आणि त्यानंतर दसऱ्याचा दिवस याला दुर्गोत्सवात खूप महत्व आहे. मात्र यावर्षीच्या दुर्गोत्सवावर पूर्णपणे कोरोनाचे सावट असून प्रशासनाने निर्बंध घातले असल्याने ना दांडिया, ना महाआरती, ना कार्यकर्त्यांची पळापळ असे वातावरण आहे. तरुणाईसह नागरिक आपापल्या घरातच घटस्थापना करुन उपवास पाळत आहेत. हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अशीच प्रार्थना दुर्गोदेवीला घराघरात केली जात आहे.

लस येईपर्यंत काळजी हाच पर्याय
कोरोना नेमका कसा आहे हे आधुनिक शास्त्राचा बोलबोला करणाऱ्या मेडिकल शास्त्रालाही कळले नाही. सामान्य नागरिक तर पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. प्रशासन सांगत आहे, आरोग्य विभाग सांगत मग नागरिक त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्दी, ताप, खोकल्याच्या या कोरोनाने सर्वांना कोड्यातच टाकले आहे. तो आहे की नाही इथपासून तो नसल्यापर्यंतच्या सर्व अफवा, वृत्ते नागरिकांच्या मनात फक्त गोंधळच निर्माण करत असताना तो मंदावत असल्याचा दिलासा परिस्थिती देवू लागलीय. आता लस येईपर्यंत काळजी हाच उपाय करत हा लढा सुरु ठेवावा लागणार आहे.

जिल्ह्यात11 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वावरहिरे ता. माण 70 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. कोरेगाव 55 वर्षीय महिला, तारगाव ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये घारेवाडी ता. कराड 67 वर्षीय महिला, खेड बु ता. खंडाळा 90 वर्षीय पुरुष, गंजे ता. जावली 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव 85 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले शनिवार पेठ, कराड 67 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे ता. खटाव 82 वर्षीय पुरुष, जैतापूर ता. सातारा 68 वर्षीय पुरुष, आटके ता. कराड 66 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे.

343 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा 25, कराड 11, फलटण 15, कोरेगाव येथील 34, वाई 19, खंडाळा 23, रायगाव 14, पानमळेवाडी 51, मायणी 4, महाबळेश्वर 14, पाटण 18, दहिवडी 13, खावली 28, पिंपोडा 5 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 69 असे एकूण 343 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले.

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 1,73,366
एकूण बाधित 44,865
घरी सोडण्यात आलेले 37,405
मृत्यू 1,449
उपचारार्थ रुग्ण 5,282

मंगळवारी
एकूण बाधित 271
एकूण मुक्त 97
एकूण बळी 11

Related Stories

विकासकामांबाबत अजितदादा राजकारण करत नाहीत: आमदार शिवेंद्रराजे

Archana Banage

अखेर गोडोली नाक्यावर रस्त्याचे काम पाडले बंद

datta jadhav

अंतिम कर्जमाफी यादीतील पात्र शेतकऱयांना खरिपासाठी कर्ज

Patil_p

राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानाना पाठवले पत्र

Patil_p

साताऱ्याच्या हिरकणी रायडरचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू

datta jadhav

Satara : दोघा भावांनी साताऱ्याचे वाटोळं थांबवावं

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!