Tarun Bharat

सातारा पालिकेतील भ्रष्ट ‘कचरा’ बाहेर टाकण्याची हीच वेळ

प्रतिनिधी / सातारा :

पाच वर्ष केलेला भ्रष्ट कारभार लपवण्यासाठी ‘इनोव्हेटीव सातारा’ या गोंडस आणि अर्थहीन शब्दाखाली सत्ताधाऱ्यांचा भूलभुलैया सुरु आहे. पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ना. अजितदादा आणि ना. एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबद्दल त्यांचे आभार मानतो. निधी मिळाल्याने नवीन इमारत चांगली होईल पण, पालिकेत चांगले प्रशासन आणण्यासाठी सातारकरांनी हा भ्रष्ट ‘कचरा’ बाहेर टाकण्याची वेळ आली असून सातारा शहराची आणि पालिकेची वाट लावणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत सातारकरांनी घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

गेल्या पाच वर्षात सातारा पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सातारकरांच्या पैशांची अक्षरशः लूट केली. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या कळवंडी, एकमेकांचे गळे धरण्याचे लाजिरवाणे प्रकार उघडय़ा डोळ्याने पाहण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी या सर्व प्रकारावर नेहमीच पांघरून घालून भ्रष्ट कारभार सुरूच ठेवला.

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा विट आल्याने सातारकारांमधून संताप व्यक्त होऊ लागला आणि त्यामुळेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पाच वर्षात सातारकरांच्या हिताचे एकही काम न करता पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु होता. सत्ताधाऱ्यांचा हा डाव सातारकरांनी ओळखल्यामुळेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘इनोव्हेटीव सातारा’ असा भूलभुलैया सुरु झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारकरांना भरभरून दिले आहे. कास धरण उंची वाढ, हद्दवाढ, मेडिकल कॉलेज हे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याने ना. पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावले. आता पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ना. पवार आणि नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी निधी दिला आहे. याबद्दल दोघांचेही मी सातारकरांच्यावतीने आभार मानतो. पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत सुसज्ज आणि चांगली होईल पण, प्रशासन चांगले असणे आवश्यक आहे. याचा गांभीर्याने विचार सातारकरांनी करणे काळाची गरज आहे. सातारा शहराचा विकास होऊन नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिकांनी भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून भ्रष्टाचाराला आळा घालावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

Related Stories

सातारा : पावसाचा जोर ओसरला, महापुराचे पाणी कायम

Patil_p

गोपीचंद पडळकरांच्या पाठींब्यासाठी जिह्यातील बैलगाडी प्रेमी जाणार

Amit Kulkarni

सिनेटसाठी मतदान सुरु; आ. हसन मुश्रीफांनी केलं मतदान

Archana Banage

सातारा : खेड ग्रामपंचायत परिसरात विठ्ठल कृपा कॉलनीतील रस्त्याची चोरी

Archana Banage

मित्राला वाचवताना युवकाचा बुडून मृत्यू

Patil_p

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

datta jadhav