Tarun Bharat

सातारा पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन

● ‘तरुण भारत’च्या भुमिकेवर प्रशासनाचा शिक्कामोर्तब,
● शुक्रवार 17 ते रविवार 26 पर्यंत पूर्ण-अंशत: टाळेबंदीप्रतिनिधी/सातारा

सातारा जिह्यात पुन्हा टाळेबंदी घोषीत झाली आहे. शुक्रवार 17 ते 22 पर्यंत पूर्ण तर 23 ते 26 अंशतः लॉक डाऊन जाहीर झाला आहे. सातारा जिह्यात कोरोनाचा डब्लिंग रेट सध्या मुंबई-पुण्यापेक्षा जास्त झाल्याचे वास्तव ‘तरुण भारत’ने मांडत ‘पूर्ण लॉकडाऊन’ची प्रखर भूमिका सातत्याने मांडली होती. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने मॅरेथॉन बैठक घेऊन ‘तरुण भारत’च्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, जनजीवनाची अडकलेली चाकं बाहेर आलीच पाहिजेत पण त्याआधी कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठीचे हे प्रयोजन आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या भीतीपोटी बुधवार-गुरुवारी गर्दी करणाऱयांना पोलीस कोठडीची हवा देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक पावले उचलण्याची गरज असून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला कडक व्हावे लागणारच आहे. समुह संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनीच दक्ष राहून कोरोनाला हरवण्यासाठी सजग राहिले पाहिजे.


जिल्हय़ाचा कोरोना बाधितांचा आकडा 1,800 च्या पार गेला आहे. मात्र गेल्या काही दिवसात डब्लिंगचा रेट हा पुण्यामुंबईपेक्षाही पुढे गेल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसाकाठी वाढणारा बाधितांचा आकडा 80-90 च्या घरात गेल्याने सर्वच जिल्हय़ात भीती वाढत आहे.

भयावह परिस्थितीतही लोकांमध्ये सवयभान रुजत नसल्यामुळे लॉकडाऊनचा निर्वाणीचा उपाय करण्याची गरज होती. सरतेशेवटी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाला हा निर्णय जाहीर करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.  


दोन टप्प्यात होणार लॉकडाऊन

टाळेबंदीसाठी शुक्रवार 17 ते बुधवार 22 जुलै पूर्णतः आणि गुरुवार 23 ते रविवार 26 अशंतः असे दोन भाग करण्यात आले आहेत.  


पूर्णतः लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंदच राहणार

या आदेशानुसार सातारा जिह्यातील सर्व किराणा दुकाने सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारी दुकाने 17 जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून 26 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. यामध्ये केवळ हॉस्पिटल व आरोग्यकर्मींनाच मुभा देण्यात आली आहे. बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेतच. याशिवाय मॉर्निंग वॉक, इव्हेनिंग वॉक या गर्दी करणाऱया बाबींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

घराबाहेर पडला तर पोलिसात जाल

मॉर्निंग-इव्हेनिंग वॉकला मनाई करताना कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडायला पूर्णतः मनाई आहे. बुधवार 22 पर्यंत झोमॅटो, स्विगी अशा घरपोच सेवा देणाऱया यंत्रणाही पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, शिवभोजन थाळी, वंदे भारतसाठी घेतली हॉटेल्स तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक म्हणून दाखल असलेली हॉटेल व सुविधा सुरु राहणार आहेत.


घरपोच दूध फक्त सकाळी 6 ते 10

लॉकडाऊन काळात दूध व्यवस्थेवरुन वादंग उडतो. त्यामुळेच पूर्ण 10 दिवस काळात घरपोच दुधासाठी सकाळी 6 ते 10 ही एकच वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. पहिल्या सहा दिवसांच्या काळात मटण, अंडी, मासे विक्रीही बंद राहणार आहे. तर पुढील काळात 9 ते 2 या वेळेत विक्री होणार आहे.


“तरुण भारत”च्या भूमिकेचे स्वागत

जिल्हय़ातील परिस्थिती गंभीर होत असताना जनमाणसातील अस्वस्थ भावना व्यक्त करत तरुण भारत ने लॉकडाऊन आवश्यकच असल्याची भूमिका ठामपणे मांडली होती. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना अनलॉकमध्ये दिलेल्या शिथीलतेचा गैरफायदा घेतला जात होता. समुह संसर्ग वाढल्यास ही परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. त्यामुळे वेळीच निर्णय घेण्याची हाक तरुण भारत ने दिली होती. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाल्यानंतर जिल्हय़ातील जनतेने तरुण भारतच्या भूमिकेचे स्वागत केले. अनेक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन करण्यात आल्याने तरुण भारत च्या भूमिकेला दुजारो दिला असून आता सर्वांनीच एकजुटीने लॉकडाऊन करुन कोरोनाला हरवले पाहिजे.


दि.17 ते 22 पूर्णतः बंद

या काळात किराणा, किरकोळ अशी सर्व दुकाने, कार्यालये, आस्थापने, दारु दुकाने, घरपोच सुविधा, मॉर्निंग वॉक, इव्हेनिंग वॉक, व्यायामशाळा, पार्लर, मंगल कार्यालये, लग्नसमारंभ, मंदिरे, धार्मिक कार्यक्रम, पेट्रोल पंप (अत्यावश्यक सेवा वगळता) पूर्णतः बंद राहणार आहे. या काळात केवळ हॉस्पिटल सुरु राहतील.


दि.23 ते 26 अशंतः बंद

या काळात व्यायामशाळा, चित्रपटगृहे, केशकर्तनालय, ब्युटीपार्लर अशा अनावश्यक सेवा पूर्णतः बंद असल्यातरी किराणा, भाजीपाला व अन्य दुकाने-आस्थापने सकाळी 9 ते 2 या वेळेत सुरु राहतील. घरपोच सुविधाही याच काळात मान्य केली आहे. याशिवाय अत्यावश्यक बाबी निर्बंधांसह सुरु राहतील.

Related Stories

महाराष्ट्रात बुधवारी 13,659 नवे कोरोना रुग्ण; 54 मृत्यू

Tousif Mujawar

खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; दोन जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

गुगलपेद्वारे अपहारप्रकरणी एकास अटक

Archana Banage

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी केंद्राची नवी नियमावली जारी

Abhijeet Khandekar

अन नागरिकांनी केली पेढय़ाच्या भैरोबाच्या परिसराची स्वच्छता

Patil_p

‘या’ शहरात किरीट सोमय्यांना कायमची प्रवेश बंदी

Archana Banage