प्रतिनिधी / उंब्रज
आशियाई महामार्गावर वराडे ता.कराड गावच्या हद्दीत अँपेरिक्षाला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर अँपेरिक्षा महामार्गावरुन सेवा रस्ताकडेला नाल्यात कोसळल्याने झालेल्या अपघात अँपेरिक्षा चालक जागीच ठार झाला आहे. गुरुवार दि. १२ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातात जगन्नाथ दुर्योधन कुंभार वय ५५ राहणार वडोली भिकेश्वर ता.कराड असे जागीच ठार झालेल्या अँपेरिक्षा चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडोली भिकेश्वर ता.कराड येथील जगन्नाथ कुंभार हे मालवाहू अँपेरिक्षा घेवून तासवडे एमआयडीसीकडे येत होते. त्यादरम्यान सकाळी ८ च्या सुमारास वराडे ता.कराड गावच्या हद्दीत शासकीय वनरोप वाटीकेजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने अँपेरिक्षाला जोराची धडक दिली. सदर धडकेत रिक्षा महामार्गाच्या कठड्यावर धडकून सेवा रस्तालगतच्या नाल्यात येवून आदळली. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला असून अँपेरिक्षा चालक जगन्नाथ कुंभार यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस.एम पिसाळ, शहाजी पाटील, एस.एस दिक्षित यांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली तसेच अपघाताचा पंचनामा करुन अपघातग्रस्त वाहणे ताब्यात घेतली आहेत.


next post