Tarun Bharat

सातारा : शिंदीगावात 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

माण तालुक्यातील घटना : देवऋषींनी दिला होता भूत लागल्याचा सल्ला : अंनिसची चौकशीची मागणी

प्रतिनिधी / सातारा

दहिवडी, ता. माणनजिक असलेल्या शिंदीगाव येथील बायली सुभाष इंगवले या 14 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी झाला. त्यानंतर अत्यंत गुप्तपणे तिचा मृतदेह एका ओढय़ाजवळ पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन देवऋषींनी मुलीला भूत लागल्याचा चुकीचा सल्ला दिला असून त्यामुळे तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. या मुलीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, ऍड. होमराव धुमाळ, वंदना माने यांनी केलीय.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदीगाव, दहिवडी येथील 14 वर्षाच्या बायली इंगवले हिचे सतत डोके दुखत होते. तसेच तापही आला होता. स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. परंतु कुटुंबियांनी तिला दुपारी गोंदवले येथील एका देवऋष्याकडे घेवून गेले. देवऋषी याने तुमच्या घराच्या आसपास बारव असून तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावस्येपर्यंत ठीक होईल असे सांगत मंत्रतंत्र करून परत पाठवले.
यानंतर संध्याकाळी जास्त त्रास झाल्याने रामचंद्र सावंत या मोही या गावच्या देवऋषीकडे मुलीला नेण्यात आले. याही देवऋषीने बारवीतले भूत लागले आहे. व पौर्णिमेपर्यंत देव बांधलेले आहेत आणि ते ठीक होणे खूप कठीण आहे. 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तिला भयंकर धोका आहे. असे सांगून मंत्रतंत्र व अंगारे, धुपारे करून परत पाठवले. त्या रात्री घरातील सर्वजण मुलीला गराडा घालून काय होतेय हे केवळ बघत बसले.

मुलगी शांत बसली होती. तिचे हात पाय थरथर कापत होते, पण तरीही सगळ्यांच्या नजरा घडय़ाळाच्या काटय़ाकडे 12 वाजण्याची वाट बघत होते. बाराला 5 मिनिटे कमी असताना ती मुलगी निपचित पडली निधन पावली. या घटनेमुळे देवऋष्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच तिला भूताने नेले ही बाब देवऋषीवरील विश्वास दृढ होण्यास कारणीभूत ठरली. कुटुंबीयांनीच काहीही बोभाटा न करता मुलीचा मृतदेह जवळ असलेल्या ओढय़ाशेजारी पुरला आहे.

ही घटना, सातारचे जिज्ञासा ग्रुपचे सदस्य निलेश पंडित यांना दहिवडीचे सुनील काटकर यांनी सांगितली. पंडित यांनी अंनिसचा संपर्क सुनील काटकर यांना दिला. काटकर यांच्याकडून फोनवर ही हकीकत प्रशांत पोतदार यांना कळाली. लगेच कार्यकर्त्यांनी दहिवडी गाठले. परंतु यामागील सत्यशोधन होऊन आपले कृत्य जनतेपुढे येईल व समाजात आपली नाच्चकी होईल, या भीतीने तसेच, देवऋषींच्या दहशतीमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला.

आमची कोणतीही तक्रार नाही, असे कुटुंबियांकडून मध्यस्थी सुनील काटकर यांना निरोप देण्यात आला. काटकर यांच्या घरी मुलीचे मामा जे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांच्याशी व गावातील काही तरुण यांच्याशी आम्ही चर्चा केली. घडलेला सर्व प्रकार हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून कुटुंबातील कोणीही तक्रार दिल्यास दोषी देवऋषी लोकांना अटक करता येईल व यापुढे अशा घटना टळतील. मुलीच्या मामाने तरी तक्रार द्यावी अशी विनंती आम्ही केली, मात्र त्यांनीही तक्रार देण्याचे नंतर नाकारले. हे अत्यंत वेदनादायी आहे.

जिल्हाधिकारी, एसपींकडे चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची दखल जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दहिवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दक्षता अधिकारी या तरतुदीनुसार असलेल्या सुमोटो अधिकारातून करावी. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषी यांची तसेच परस्पर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱया दोषींची सखोल चौकशी करावी अशी मागणी सातारा जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व सिव्हिल सर्जन यांच्याकडे केली आहे.

Related Stories

सातारा : पुसेसावळी प्रशासन गांधारीच्या भूमिकेत

Archana Banage

काशीळ येथे दोन एसटीचा अपघात

Archana Banage

बांधकामे वाचवण्यासाठी मिळकतधारकांची धावपळ

Patil_p

नागरिकत्व कायद्याविरोधात कराडला भव्य मार्चा

Patil_p

बनावट दागिने गहाण ठेवून सराफाची फसवणूक

Patil_p

“30 लाख दे, नाहीतर…”; काँग्रेस नेते अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav
error: Content is protected !!