प्रतिनिधी / वाई
पसरणी (ता. वाई) येथील अजय विजय महांगडे (वय22) याचा बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरुन सांडव्यावरुन पडून जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पसरणी येथील अजय महांगडे व त्याचे ७ मित्र बलकवडी धरणावर फिरायला गेले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धरणावरील सिक्युरटी गार्ड जेवायला गेला होता. त्यावेळी हे युवक सांडव्या नजीक सेल्फी घेत होते. अजय सेल्फी घेण्यासाठी सांडव्याच्या नजीक गेला. निसरड्या जागेवरुन पाय घसरल्याने तो सांडव्यावरुन खाली पडला. यावेळी सांडव्यातून पाण्याचा विसर्गही सुरु होता. अजयच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. सांडव्यातील पाणी पुर्णपणे बंद करुन स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने रोप व ट्युबच्या मदतीने त्याचा मृतदेह सायंकाळी ६ च्या सुमारास सांडव्यातून बाहेर काढण्यात आला.


अजय हा प्लम्बिंगची कामे करत होता. सुस्वभावी असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजयच्या पश्चात आई, वडिल, विवाहित बहिण, एक भाऊ असा परिवार आहे.