स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पोक्सामधील एक फरारी आरोपीही जेरबंद
प्रतिनिधी /सातारा
साताऱयातील पोवईनाक्यावरील फोडजाई मंदिर परिसरात बांधकाम कार्यालयासमोर असलेल्या घरासमोर शतपावली करणाऱया वृध्द नागरिकास मारहाण करुन लुटणाऱया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. तर सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोतंर्गंत दाखल गुन्हय़ातील फरारी आरोपीला देखील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अतिक्रमण मुजेश विज्या काळे (रा. रेवडी, ता. कोरेगाव), नकूल छगन काळे (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) तर बालकाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अधिक्षक उर्फ अध्यक्ष पितांबर शिंदे (रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री दहाच्या सुमारास पोवईनाका परिसरातील घरासमोर जेवणानंतर शतपावली करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकास मारहाण करत दोन अनोळखींनी त्यांचा मोबाईल व घडय़ाळ असा 15 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
या जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तपास करण्यास सांगितले होते. तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सीटीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण केल्यावर यातील आरोपी रेवडी, ता. कोरेगाव येथील असल्याचे समोर आले.
त्यानंतर तपास पथकाने आरोपींच्या घरावर छापा टाकला तेव्हा दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. हे दोन्ही आरोपी खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीतील अट्टल आरोपी आहेत. त्यांनी वृध्दाला लुटले तसेच सैनिक व आंबेघर, ता. जावली येथील चंदनाची झाडे चोरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या छाप्यातच पोक्सोतंर्गंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ातील फरारी आरोपीही यावेळी पोलिसांच्या जाळय़ात आला असून त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याला सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सातारा यांच्या सुचना प्रमाणे तसेच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक मधुकर गुरव, सहायक उपनिरीक्षक उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, रवि वाघमारे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, गणेश कापरे, कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहीत निकम, धीरज महाडीक, वैभव सावंत चालक पोलीस नाईक गणेश कचरे, विजय सावंत, मोना निकम, कॉन्स्टेबल तनुजा शेख, माधवी साळुंखे यांनी सहभाग घेतला.