Tarun Bharat

साताऱ्यात एका दिवसात चौघे कोरोनाग्रस्त, जिल्हावासियांचा ठोकाच चुकला

प्रतिनिधी/सातारा

बुधवार सातारा जिल्हय़ाच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. एकाच दिवशी जिल्हय़ात कोरोनाचे चार रूग्ण आढळून आल्याने जिल्हय़ावर कोरोनाची दहशत कित्येक पटीने वाढली.

या चौघांमुळे जिल्हय़ातील बाधितांचा आकडा 11 वर गेला. गेल्या चार दिवसांपासून रूग्णसंख्या वाढली नसल्याचे समाधान व्यक्त व्हायच्या आधीचे त्या कथीत समाधानाच्या चिंधडय़ा उडाल्या. कराड तालुक्यात 2, फलटण तालुक्यात 1 तर पाटण तालुक्यातील दहा महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा यात समावेश आहे. जिल्हय़ात सापडलेल्या 11 पैकी दोघांची परदेशवारीची हिस्ट्री आहे, एकाची अन्य राज्याची, एकाची पुणे प्रवासाची तर सात जणांची मुंबईप्रवासाची हिस्ट्री असल्याने मुंबईहून परतलेल्यांच्या दहशतीने सारा जिल्हा हवालदिल झाला आहे. एकाच दिवसांत चार कोरोनाबाधित सापडल्याने जिल्हा प्रशासनाने हाय अलर्टवर कामाला सुरूवात केली असून सुचनांची अत्यंत चफकलतेने बजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

जगात, देशात कोरोनाचा कहर सुरू असला तरी मुंबईतील आकडेवारीने सातारकरांची आधीच झोप उडवलीय. मुंबईत कोरोनाची स्थिती जाणून घेतानाच सातारा जिल्हय़ात सुमारे तीन लाखांहून अधिक लोक आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार दिवसांत जिल्हय़ात एकही बाधित आढळून आला नाही शिवाय विलगीकरण कक्षांत दाखल होणाऱयांची संख्या मर्यादित होत आली होती. त्यामूळे लोक हुश्श म्हणणार तोच….

बुधवारचा दिवस सातारा जिल्हावासियांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. गेल्या 15 मार्चपासून कोरोनाचा लढा तीव्र झाला असताना गेल्या 30 दिवसांत 7 कोरोनाबाधित सापडले होते. पण बुधवारी एकाच दिवसांत चार जण कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट येताच आरोग्य यंत्रणांसह जिल्हा प्रशासन व यंत्रणा खाडकन सतर्क झाल्यात. या चार जणांपैकी तीन जण होम कोरोंन्टीनमध्ये असल्याचे समजत असल्याने संभाव्य धोका कमी तिव्रतेचा असेल असे मानले जात आहे. मात्र पाटण तालुक्याच्या दुर्गम भागातील दहा महिन्याच्या मुलामध्ये कोरोनासंसर्ग असल्याचे कळताच काळजाला पिळ पडल्यासारखी अनेकांची परिस्थिती झाली.

त्या कोरोनाबाधिताच्या वृद्ध आईलाही कोरोनाचा संसर्ग

वाशी-मुंबई येथे मच्छी व्यवसाय करणारा उंडाळे खोऱयातील महारूगडेवाडीच्या व्यक्तीचा कोरोनामुळे जिल्हय़ात दुसरा बळी गेला होता. याच केरोनाबाधिताच्या संपर्कातील सर्वांनाच विलगीकरणांत ठेवले होते. त्यापैकी त्याच्या 75 वर्षीय आईलाच कोरोना असल्याचे बुधवारच्या टेस्टमध्ये समोर आले. पोटचा मुलगा कोरानाने गेल्या असताना त्याच कोरोनाने त्या वृद्धेला त्याच्या पाशात घेतले आहे. संबंधित वृद्धा विलगीकरणांत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाटण तालुक्यांत दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना

मुंबईहून आलेल्यांची संपुर्ण जिल्हय़ात दहशत असताना पाटण तालुक्याचा जीव तर टांगणीलाच लागला आहे. या तालुक्यात सुमारे पाऊण लाख जण पुण्या-मुंबई येथून आल्याने भिती आहे. चाफळ खोऱयांतील डेवरण गावच्या चिमुकल्याला कोरोना झाला आहे. हे बाळ गावांतच रहात असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी त्यांचा संबंध गावातले, पंचक्रोशीतले लोक मुंबईशी लावत आहेत. बाळाचे वडिल मुंबईत रहात असून बाळ, आई, चुलता-चुलती हे मुंबईहून आले होते. इकडे आल्यानंतर बाळाला बरं नसल्याने त्याला स्थानिक डॉक्टरला दाखवण्यात आल्यानंतर जाळगेवाडीतल्या पाहूण्यांकडे बाळ व बाळाशी संबंधित काही दिवस राहिले होते असे इथल्या ग्रामस्थांकडून आवर्जुन सांगितले जात असले तरी प्रशानसनाने त्याला दुजोरा दिलेला नाही.

फलटण तालुक्यातही कोरोनाबाधित

कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित सापडलेल्या महिलेने फलटण तालुक्यात प्रवास केल्याने काही दिवस फलटण तालुका हडबडून गेला होता. याच फलटणनजीकच्या एका 27 वर्षीय महिला डॉक्टरला कोरोनासंसर्ग झाला आहे. तरडगाव येथील रहिवासी असलेल्या या डॉक्टर लोणंद येथे प्रॅक्टीस करतात. गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्याला एका कोण्या सेमीनारला गेल्या होत्या. पुणे प्रवास केल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना होम कॉरेन्टीन केले होते तर त्यांच्या घशातील स्त्रावाची टेस्टही केल्याचे सांगण्यात येते. याच महिला डॉक्टर कोरोनाबाधित असल्याने फलटण बुधवारपासून खडबडून जागा झालाय.

ओगलवाडीतला ‘तो’ रूग्ण, आला बेळगावच्या हाया-रीस्क मधला

बुधवारी सापडलेला चौथा कोरोनाग्रस्त हा कराड तालुक्यातील ओगलेवाडीत आढळलेला आहे. वास्तवीक हा रेल्वे खात्यात कामाला असून त्याने स्वतःहून दाखवलेल्या सतर्कतेने त्याला सातारा जिल्हय़ात कोरोनाबाधित म्हणून दाखल करून घेतले असून त्याच्यावर उपचारांना सुरूवात केली आहे.

हा चौथा कोरोनाबाधित 28 वर्षीय युवकाने स्वतःहून आपण बेळगाव येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याचे सातारा जिल्हा प्रशासनाला सांगितले. त्याप्रमाणे त्याला होम कोरोंन्टीन ठेवण्यात आले होते. बुधवारी त्याचा अहवाल पॉझेटिव्ह आला. वास्तविक हा रेल्वे खात्यातील युवक बिहार राज्यातील मुळ रहिवासी आहे.

Related Stories

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सहकारमंत्र्यांचाच यंत्रणेवर दबाव : दरेकर

datta jadhav

दिपावळीतल्या फटाक्यांवर आता बंदीची होवू लागली मागणी

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 5 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या शहांना न्यायालयाने ठोठावला 25 हजारांचा दंड

datta jadhav

जुन्या भांडणातून सलून चालकावर हल्ला

datta jadhav

पोटनिवडणुका बिनविरोध होतील, हे त्यांनी डोक्यातून काढावं

datta jadhav