Tarun Bharat

सात्विक-अश्विनी मिश्र दुहेरी मानांकनात टॉप 20 मध्ये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशियाई टप्प्यात नुकत्याच झालेल्या विविध बॅडमिंटन स्पर्धांत चमकदार प्रदर्शन केल्याचे बक्षीस भारताची मिश्र दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व अश्विनी पोनप्पा यांना मिळाले असून जागतिक मानांकनात त्यांनी टॉप 20 मध्ये स्थान मिळविले आहे. मंगळवारी बीडब्ल्यूएफने ताजी मानांकन यादी जाहीर केली आहे.

टोयोटा थायलंड ओपन या सुपर 1000 स्पर्धेत सात्विक-अश्विनी यांनी उपांत्य फेरी गाठत असा पराक्रम करणारी मिश्र दुहेरीची पहिली भारतीय जोडी होण्याचा मान मिळविला. या जोडीने एकदम 16 स्थानांची प्रगती करीत 19 व्या स्थानावर झेप घेतली असून हे त्यांचे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे. थायलंड ओपन स्पर्धेत या जोडीने मलेशियाच्या जागतिक पाचव्या मानांकित चॅन पेंग सून व गोह लियु यिंग या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का दिला होता.

पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत सात्विक व चिराग शेट्टी यांनी टोयोटा थायलंड ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत दहावे स्थान कायम राखले आहे. याशिवाय एमआर अर्जुन व धुव कपिला यांनी एकमद 33 स्थानांची प्रगती करीत 64 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अन्य भारतीय खेळाडूंत वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू महिला एकेरीत सातव्या क्रमांकावर कायम आहे तर सायनाने एका स्थानाची प्रगती करीत 19 वे स्थान मिळविले आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने एका स्थानाची बढती मिळवित 13 वे स्थान मिळविले आहे तर समीर वर्माने चार स्थानांची प्रगती करीत 27 व्या स्थानावर मजल मारली आहे. थायलंड ओपनमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. बी.साई प्रणीत थायलंडमधील पहिल्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता तर दुसऱया स्पर्धेत कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने त्याला माघार घेणे भाग पडले होते. त्याची एका स्थानाने घसरण झाली असून तो 17 व्या तर पारुपल्ली कश्यपला दोन स्थानांनी खाली घसरावे लागल्याने 26 व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

रविवारी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा झाल्यानंतर बीडब्ल्यूएफने जागतिक मानांकन प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. स्विस ओपन सुपर 300 ही ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी रेस टू ऑलिम्पिकमधील पहिली स्पर्धा असणार आहे. 2-7 मार्च या कालावधीत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. भारतात होणारी इंडियन ओपन (11-16 मे) ही ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी शेवटची स्पर्धा असेल. 18 मे रोजी ऑलिम्पिकसाठी शेवटची मानांकन यादी जाहीर करण्यात येईल आणि यातील मानांकनानुसार ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी स्पष्ट होणार आहे.

Related Stories

रणजी सामन्यात सूर्यकुमारची फटकेबाजी, जैस्वाल-रहाणे यांची शतके

Patil_p

मिडलसेक्स संघाच्या प्रशिक्षकपदी जॉन्सन

Patil_p

आजपासून पुन्हा रंगणार ‘रात्रीस खेळ चाले’!

Patil_p

युवराज सिंगचे सलग 4 षटकार

Patil_p

‘शतकवीर’ क्रिकेट महर्षी वसंत रायजी यांचे निधन

Patil_p

भारतीय हॉकी संघांचा युरोपियन दौरा अधांतरी

tarunbharat