भरधाव जीपची ट्रकला धडक : उत्तर प्रदेशमधील दुर्घटना
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज-लखनौ महामार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ट्रक व जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत ही दुर्घटना घडली. ठार झालेल्यांमध्ये सात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की जीप पूर्णपणे ट्रकमध्ये घुसली होती व तिचा चुराडा झाला होता. लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱया वऱहाडी मंडळीवर काळाने घाला घातल्याने, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही संबंधित प्रशासकीय अधिकाऱयांना दिले.
अपघातग्रस्त मंडळी शेखपूर गावातील लग्न समारंभ आटोपून घराकडे परतत असताना हा अपघात घडला. जीप अत्यंत भरधाव वेगात ट्रकमध्ये घुसली की, नंतर कटरच्या सहाय्याने तिचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. रात्रीची वेळ असल्याने मदत-बचाव पथक व पोलिसांना यासाठी जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला. जीप चालकास डुलकी आल्याने भरधाव वेगातील जीप रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. जखमींवर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.