Tarun Bharat

सानिया मिर्झाची हंगामाअखेर निवृत्तीची घोषणा

Advertisements

शारीरिक थकवा जाणवत असल्याने निवृत्त होण्याचा निर्णय, अमेरिकन ग्रँडस्लॅममध्ये कारकिर्दीचा समारोप करण्याचा मानस

मेलबर्न / वृत्तसंस्था

भारताची आघाडीची टेनिसतारका सानिया मिर्झाने 2022 हंगामाअखेर आपण निवृत्त होत असल्याची बुधवारी घोषणा केली. अलीकडील कालावधीत बराच शारीरिक थकवा जाणवत असल्याने आणि पूर्वीइतकी उर्जा राहिली नसल्याने आपल्याला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे ती याप्रसंगी म्हणाली.

सानियाने आजवर 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्यात 3 मिश्र गटातील जेतेपदांचा प्राधान्याने समावेश आहे. भारतीय टेनिसमधील सर्वात यशस्वी महिला खेळाडू या नात्याने सानिया यंदा हंगामाअखेरीस आपल्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता करेल. 35 वर्षीय सानियाने बुधवारी ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. सानिया महिला दुहेरीत नादिया किचेनोकच्या साथीने खेळत होती. या जोडीला स्लोव्हेनियाच्या तमारा झिदान्सेक व काया जूवन यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

‘निवृत्तीसाठी अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तंदुरुस्तीसाठी मला बराच वेळ द्यावा लागत आहे आणि माझा मुलगा आता 3 वर्षांचा झाला असून स्पर्धेच्या प्रत्येक ठिकाणी त्याला घेऊन जात त्यालाही धोक्यात आणत आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे खबरदारी घेणे भाग आहे आणि यातच सर्व हित सामावलेले आहे’, असे सानिया पत्रकार परिषदेत म्हणाली.

‘शरीर थकले असल्याचीही जाणीव होते आहे. आज माझा गुडघा खूपच दुखत होता. त्यामुळे आम्ही हरलो, असे मला म्हणायचे नाही. पण, वय जसे वाढत जाईल, तसे दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागत आहे. खेळाचा जोवर आनंद लुटता येईल, तोवर खेळत राहायचे, असे मी नेहमी म्हणत आले आहे. पुनरागमन करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी मी बरीच मेहनत घेतली. वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मातृत्वानंतर पुनरागमन सहजसोपे अजिबात असत नाही. पण, हे प्रत्यक्षात आणता येऊ शकते, याचा दाखला मी दिला. माझे उदाहरण प्रेरणादायी ठरले तर अधिक आनंद होईल’, याचा तिने पुढे उल्लेख केला. यंदा अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये खेळण्याचा विचार असला तरी इतका प्रदीर्घ विचार करण्याऐवजी प्रत्येक स्पर्धेगणिक, प्रत्येक आठवडय़ागणिक तंदुरुस्तीवर भर देईन, असे ती म्हणाली.

स्वित्झर्लंडची महान खेळाडू मार्टिना हिंगीस हिच्यासह दुहेरीतील अव्वलस्थान गाजवणाऱया सानिया मिर्झाने महिला एकेरीत पहिल्या 30 खेळाडूंमध्ये एन्ट्री प्राप्त केली. 27 हे तिचे सर्वोत्तम मानांकन राहिले. मात्र, मनगटाच्या दुखापतीनंतर तिने दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने एकेरीत खेळणे सोडून दिले. दुहेरीत उत्तम यशप्राप्ती केली असली तरी 2022 नंतर खेळणे कठीण असल्याचे संकेत मिळाले आणि तिने आपण हंगामाअखेर निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

‘सामना कोणताही असो, अनुभव पणाला लावून खेळण्यावर कोणत्याही ऍथलिटचा भर असतो. मी ही याला अपवाद नाही. मात्र, अलीकडे दुखापतीचे प्रमाण वाढले आहे. उजव्या गुडघ्याची दुखापत सातत्याने जाणवत आली आहे. शिवाय, मनगटाची दुखापत देखील काही दिवसांपासून सतावत आहे’, असे सानिया शेवटी म्हणाली.

Related Stories

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र सलग दुसऱया वषी विजेते

Patil_p

फख्र झमान न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

Omkar B

फिलिपाईन्सला नमवून कोरिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून हॅलेपची माघार

Patil_p

दिल्ली बुल्स अंतिम फेरीत दाखल

Patil_p

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे दुहेरी गोल

Patil_p
error: Content is protected !!