Tarun Bharat

सानिया मिर्झाला ‘फेड कप हार्ट’ पुरस्कार

बहुमान मिळविणारी पहिली भारतीय टेनिसपटू, बक्षीस रक्कम मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा फेड कप हार्ट ऍवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. मातृत्वानंतर टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केल्याबद्दल तिला हा बहुमान मिळाला आहे. सोमवारी त्याची घोषणा करण्यात आली. बक्षिसादाखल मिळणारी रक्कम तिने मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली आहे.

सानियाला हा पुरस्कार आशिया ओशेनिया विभागासाठी मिळाला आहे. ग्रुप एक विभागात तीन खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिला एकूण 16985 पैकी 10,000 हून अधिक मते मिळाली. चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन मतदानातून या पुरस्कारासाठी खेळाडूची निवड करण्यात आली. 1 मे पासून नामांकित खेळाडूंना मतदान करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली होती. सानियाला जगभरातून एकूण 60 टक्के मतदारांनी पसंती दिली. यावरून फेडरेशन कप स्पर्धेत ती प्रचंड लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले.

‘फेड कप हार्ट पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय होणे हा माझा मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार मी संपूर्ण देशाला, सर्व चाहत्यांना समर्पित करीत असून मला मतदान केलेल्यांची मी मनापासून आभारी आहे. भविष्यातही भारताचा लौकीक वाढविणारी कामगिरी माझ्याकडून कायम होत राहील, अशी मी आशा करते,’ अशा भावना सानियाने व्यक्त केल्या. इंडोनेशियाच्या 16 वर्षीय प्रिस्का मॅडेलीन नुग्रोहोला मागे टाकत सानियाने हा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे सानियाला 2000 डॉलर्सचे बक्षीस मिळाले असून तिने ते कोव्हिड-19 विरुद्धच्या लढय़ासाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीला देण्याचे जाहीर केले. 2009 पासून या पुरस्काराला आयटीएफने सुरुवात केली असून या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱया टेनिसपटूला तो देण्यात येतो.

सानियाने चार वर्षांच्या खंडानंतर फेडरेशन चषक स्पर्धेत पुनरागमन केले आणि भारताला प्रथमच प्लेऑफ फेरी गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ऑक्टोबर 2018 मध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये तिने कोर्टवर पुनरागमन केले आणि लगेचच होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत नादिया किचेनॉकसमवेत दुहेरीचे जेतेपद पटकावत यशही मिळविले.

Related Stories

सौराष्ट्रचा मुंबईवर निर्णायक विजय

Patil_p

अँडी मरे दुसऱया फेरीत

Patil_p

युनूस खानकडून प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p

चौथ्या दिवशीही पाऊस ‘जिंकला’!

Patil_p

ऑलिम्पिकसाठी 26 सदस्यीय ऍथलेटिक्स पथक जाहीर

Patil_p

इंग्लंडच्या रूटचे 19 वे कसोटी शतक

Patil_p