ब्राझिल देशात सात कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱया डायनोसोरच्या एका प्रजातीचा शोध लागला आहे. या डायनोसोरना दात नव्हते. दात नसलेल्या डायनासोरची ही विश्वातील आतापर्यंत सापडलेली एकमेव प्रजाती आहे. या डायनासोरचा सांगाडा आढळल्यानंतर शास्त्रज्ञही बुचकळय़ात पडले आहेत. हे डायनासोर आकाराने अत्यंत लहान होते आणि त्यांना अलीकडच्या काळात थेरोपॉड या नावाने ओळखले जात आहे. त्यांची उंची 3 फूट आणि लांबी 80 सेंटीमीटर होती. या प्रजातीचे नाव आता बेर्थासोर लिओपोल डायनाय असे ठेवण्यात आले आहे.


या डायनोसोरचे तोंड पक्ष्यांच्या चोचीच्या आकाराचे होते. पक्ष्यांप्रमाणेच त्यांनाही दात नव्हते. या डायनोसोरचा सांगाडा सापडल्यानंतर ब्राझिलच्या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाने एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. त्यात या प्रकारच्या डायनासोरबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले असून या प्रजातीचा अधिक अभ्यास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रजातीच्या डायनासोरचा संपूर्ण सांगाडा प्रथमच हाती लागला असल्याने आता हा अभ्यास व्यवस्थितरीत्या करता येणार आहे. या सांगाडय़ाचा शोध जिओवान अल्वेस सुओजा या संशोधकाने लावला आहे.
काही वर्षांपूर्वी चीनमध्ये याच प्रजातीतील एका डायनासोरचे 18 कोटी वर्षांपूर्वीचे अवशेष मिळाले होते. त्यानंतर ही प्रजाती प्रकाशात आली होती. ही प्रजाती दंतविहीन असली तरी मांसाहारी होती. पक्षी ज्याप्रमाणे चोचीने मांसखंडाचे तुकडे करून खातात, अशाप्रकारे हे डायनासोर मांस खात असत. ते शाकाहारीही होते, असे अभ्यासातून समजून आले आहे.