Tarun Bharat

सामना हरला, पण मने जिंकली!

स्वित्झर्लंडचा टेनिस लिजेंड रॉजर फेडररच्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता

लंडन / वृत्तसंस्था

स्वित्झर्लंडचा टेनिस लिजेंड रॉजर फेडररने शुक्रवारी आपल्या प्रदीर्घ, देदीप्यमान कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला आणि त्याच्या निरोपाच्या संबोधनाने तो व नदालसह सारेच भावूक झाले. लेव्हर चषक टेनिस स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत फेडरर व नदाल हे प्रदीर्घकालीन प्रतिस्पर्धी युरोप संघातून एकत्रित खेळले. मात्र, अमेरिकन जोडी जॅक सॉक व फ्रान्सेस टोफे यांनी त्यांचे आव्हान 4-6, 7-6 (2), 11-9 अशा फरकाने संपुष्टात आणले. ही स्पर्धा टीम युरोप व टीम वर्ल्ड अशा दोन संघात खेळवली जात आहे. 

फेडरर व नदाल या उभयतांनी पूर्ण सामन्यात जोरकस खेळ साकारत जोरदार स्ट्रोकप्लेच्या बळावर चाहत्यांना खिळवून ठेवले. पहिल्या सेटमधील तिसऱया गेममधील फेडररचा फोरहँडचा फटका जणू त्याच्या खेळीतील वैविध्याचा नजराणा सादर करुन गेला. जरी त्या रॅलीत प्रतिस्पर्ध्यानी गुण कमावला असला तरी  बेसलाईनवरुन परतताना फेडरर-नदाल या स्विस-स्पॅनिश लिजेंड्सच्या चेहऱयावरील स्मित हास्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे होते.

फेडरर-नदाल यांनी पहिला सेट जिंकत अमेरिकन जोडीला पहिला धक्का दिला होता. पण, दुसऱया सेटमध्ये अमेरिकन जोडीने जोरदार कमबॅक केले आणि 7-6 अशा निसटत्या विजयासह सामन्याचा निकाल टायब्रेकरपर्यंत लांबणीवर टाकला. टायब्रेकरमध्ये पुन्हा एकदा सॉक व टोफे यांनी मॅचपॉईंट वाचवत रोमांचक विजय मिळवला.

सुमारे 2 तास 16 मिनिटे चाललेल्या या लढतीत माजी अव्वलमानांकित फेडररने सहजपणे ग्राऊंडस्ट्रोक्स लगावले. पण, देदीप्यमान कारकिर्दीत एकेरी-दुहेरीतील 1382 वा विजय मिळवण्यात मात्र त्याला यश आले नाही. सामन्यानंतर फेडरर अर्थातच भावूक झाला आणि या स्पर्धेतील संघसहकारी नदालला अलिंगन दिल्यानंतर चाहत्यांना अभिवादन दिले. ऑन-कोर्ट इंटरव्हय़ूमध्ये त्याला अश्रू अनावर झाले. फेडररचे पालक, पत्नी मिर्का व चार मुलेही यावेळी कोर्टवर आली.

‘आज सामन्यासाठी कोर्टवर उतरलो, त्यावेळी मला खूप एकाकी वाटले. वास्तविक, पूर्ण कारकिर्दीत मी एकेरीतच अधिक खेळलो. पण, माझी टीम माझ्यासोबत सातत्याने असायची. माझ्या आजवरच्या वाटचालीत त्या सर्वांचा मोठा वाटा राहिला आहे. या सर्वांचा मी त्याबद्दल मनापासून आभारी आहे’, असे फेडरर येथे म्हणाला.

माजी अव्वलमानांकित फेडररने आपल्या कारकिर्दीत 103 टूर जेतेपदे नोंदवली असून 310 आठवडे तो एटीपी मानांकनात अव्वल राहिला. फेडरर व नदाल यांच्यातही पूर्ण कारकिर्दीत सातत्याने जुगलबंदी रंगत राहिली. हे दोघेही दिग्गज टेनिसपटू 2004 मध्ये मियामीतील एटीपी मास्टर्स 1000 इव्हेंटमध्ये सर्वप्रथम आमनेसामने भिडले आणि त्यानंतर ते एकूण 39 वेळा लढले. यातील 24 सामने फायनल्सचे होते. फेडरर सहभागी झालेल्या लेव्हर चषक स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून आज त्याची सांगता होत आहे.

जेव्हा फेडररसह नदालचे डोळेही पाणावले!

नदाल-फेडरर यांच्यात पूर्ण कारकिर्दीत सातत्याने संघर्षाची ठिणगी पडत गेली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी प्रत्येक वेळी आमनेसामने भिडताना आपली पूर्ण ताकद, आपला पूर्ण अनुभव पणाला लावला. पण, लंडनमधील लेव्हर चषक स्पर्धेत युरोप संघातून एकत्र येण्याची वेळ आली, त्यावेळी याच दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि फेडरर निरोपाचा सामना खेळत असताना केवळ फेडररचे नव्हे तर नदालचेही डोळे पाणावले.

एरवी, मैदानावरील हे दिग्गज प्रतिस्पर्धी प्रचंड मनोधैर्यासाठी ओळखले गेले असले तरी या लढतीने त्यांच्यातील भावूक किनार दाखवून दिली. केवळ टेनिससाठी नव्हे तर अवघ्या क्रीडा वर्तुळासाठी हा स्तंभित करणारा क्षण ठरला.

फेडरर लॉकर रुममध्ये कोणाशीही संवाद साधत असताना ‘प्लीज’ व ‘थँक यू’ शिवाय एकदाही बोलत नाही, असे अलीकडेच एका टेनिसपटूने म्हटले होते. वास्तविक, फेडरर व नदाल आमनेसामने भिडत गेले, त्यावेळी त्यांच्यात संघर्ष झडलाच. पण, तरी यानंतरही यातील एक खेळाडू निवृत्त होत असताना दोघांनीही महानतेची आपली कवचकुंडले बाजूला ठेवत मनाचा मोठेपणा दाखवला, ते अधिक कौतुकास्पद ठरले.

विराट कोहलीने ट्वीट केले, हेच तर खेळाचे अभिजात सौंदर्य!

फेडरर व नदाल यांनी एकत्रित खेळताना दाखवून दिलेल्या खिलाडुवृत्तीचे भारतीय क्रिकेट संघातील भक्कम आधारस्तंभ विराट कोहलीने देखील मुक्त कंठाने कौतुक केले. ‘ज्यावेळी आपल्या एखाद्या प्रतिस्पर्ध्याचे डोळेही पाणावतात, त्यावेळी तो आपल्या प्रतिस्पर्ध्याप्रती असलेला आदर असतो. प्रतिस्पर्ध्यांमध्येही अशी आत्मीयतेची भावना असते, हेच तर खेळाचे अभिजात सौंदर्य आहे’, असे ट्वीट विराटने यावेळी केले.

Related Stories

चेस ऑलिम्पियाडमध्ये भारत 6 संघ उतरवणार

Patil_p

मँचेस्टर युनायटेड युरोपा लीगच्या उपांत्य फेरीत

Patil_p

कौशिक, रविंदर पाल सिंग यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत

Patil_p

‘त्या’ चुकीमुळे ऋषभ पंतचे ट्रोलिंग

Omkar B

नवदीप सैनीवर ‘विराट’ स्तुतिसुमने!

Patil_p

बार्सिलोना, रियल माद्रीद खेळाडूंची कोरोना चांचणी

Patil_p