Tarun Bharat

सामाजिक अंतर-मास्क सक्तीसाठी उदासीनता का?

सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांसह एपीएमसीसारख्या ठिकाणी मास्कची सक्ती करण्याकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरण्याची सूचना राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह शाळा-महाविद्यालये आणि खासगी संस्थांना केली आहे. मात्र, मास्क वापरण्यासाठी केवळ महापालिकेकडून आटापिटा सुरू आहे. अन्य सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांसह एपीएमसीसारख्या ठिकाणी मास्कची  सक्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

मागीलवषी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. घराबाहेर पडणाऱयांना लाठीचा प्रसाद मिळाला. अन्य सरकारी कार्यालयात किंवा कामानिमित्त बाहेर जाणाऱयांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात आले. मात्र, मास्क परिधान करणे आणि सामाजिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले. आगामी वर्षभराकरिता कोरोना नियमावलीचे पालन करावे, अशी सूचना राज्य शासनाने जुलै 2020 मध्ये केली होती. विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्याचा आदेशही बजावला होता. बदलणाऱया परिस्थितीनुसार नियमावलीमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरण्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे.

सामाजिक अंतर पाळण्याची सूचना करण्याबरोबरच सभा-समारंभांसाठी, विवाह सोहळय़ांकरिता परवानगी बंधनकारक करण्यात आली. तरीही सामाजिक अंतर राखले जात नाही. सामाजिक अंतर पाळावे आणि मास्क वापरासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याची सक्ती करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पण याकरिता केवळ महापालिकेकडूनच आटापिटा सुरू आहे. वास्तविक पाहता कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना सर्व सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये, एपीएमसी बाजारपेठ आदींसह विविध संस्थांना राज्य शासनाने नोटीस बजावली आहे. मात्र, कोरोना नियमावलीचे पालन करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी महापालिका व्यतिरिक्त कोणत्याच संस्था प्रयत्नशील नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळेच एपीएमसीसारख्या ठिकाणी विनामास्क व्यवहार सुरू आहेत. या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही सरकारी कार्यालयांमध्ये फलक लावून मास्कबाबत जागृती करण्यात आली आहे. पण अंमलबजावणीसाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू केल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती केली होती. पण सध्या कोरोनाचा प्रभाव वाढल्याने शाळांना पुन्हा सुटी जाहीर केली आहे. मात्र, दहावीपासून पुढील वर्ग सुरू असल्याने हे विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात जात आहेत. मात्र, बस व खासगी वाहनाने प्रवास करताना मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे विविध बसस्थानकांवर आढळून येत आहे.

मास्क सक्तीची ऐसी की तैसी

मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी परिवहन मंडळानेदेखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. तशी सूचना राज्य शासनाने केली असून, बसमध्ये ठराविक प्रवासी घेण्याची अटही घातली आहे. मास्क नसल्यास बसमध्ये प्रवेश देऊ नये, असा आदेशही बजावला आहे. मात्र, परिवहन मंडळाकडून याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ठरावीक प्रवासी घेण्याऐवजी संपूर्ण बस तुडुंब भरलेली असते. काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क असतो तर काही प्रवासी विनामास्क प्रवास करतात. त्यामुळे परिवहन मंडळाकडून मास्क सक्तीची ऐसी की तैसी केली जात आहे.

जबाबदारी परिवहन मंडळाची नाही का?

बसमधील प्रवाशांना मास्क सक्ती करण्यासाठी महापालिकेनेच प्रयत्न करणे गरजेचे आहे का? ही जबाबदारी परिवहन मंडळाची नाही का? अशी विचारणा होत आहे. त्यामुळे जादा बसची सुविधा उपलब्ध करून नियमानुसार प्रवाशांना बसमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी होत आहे. शासनाने सर्वच संस्थांना नोटीस बजावून कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना केली आहे. पण मास्कसक्ती आणि सामाजिक अंतर राखण्याच्या अंमलबजावणीसाठी अन्य संस्था उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

अतिक्रमण हटावसाठी ठोस उपाययोजना नाही

Amit Kulkarni

जल्लोशपूर्ण वातावरणात दौडचे स्वागत

Patil_p

बेळगाव रेल्वेस्थानकात एटीव्हीएम मशीन पुन्हा कार्यान्वित

Amit Kulkarni

तिसऱया रेल्वेगेटजवळील खोदकाम जीवघेणे

Amit Kulkarni

चौघा जणांची कोरोनावर मात

Omkar B

ज्ञानमंदिरांतूनच मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे

Amit Kulkarni