Tarun Bharat

सायना, लक्ष्य सेन, प्रणॉय दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली.

माजी जागतिक अग्रमानांकित सायनाला मागील वर्षी दुखापतीमुळे अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. तिने येथे दुसरी फेरी गाठताना झेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्वाबिकोव्हाविरुद्ध विजय मिळविला. पहिला गेम सायनाने 22-20 असा जिंकल्यानंतर दुसऱया गेममध्ये सायनाने 1-0 अशी आघाडी घेतली असताना तेरेझाने पाठदुखीमुळे सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सायनाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला. तिची पुढील लढत आपल्याच देशाच्या मालविका बनसोडविरुद्ध होणार आहे. बनसोडने आपल्याच देशाच्या समिया इमाद फारूकीवर 21-18, 21-19 अशी मात करून दुसरी फेरी गाठली आहे.

पुरुष एकेरीत आठव्या मानांकित प्रणॉयने स्पेनच्या पाब्लो ऍबियनवर 21-14, 21-7 असा विजय मिळविला. त्याची लढत मिथुन मंजुनाथशी होईल. मंजुनाथने फ्रान्सच्या अरनॉड मर्कलवर 21-16, 15-21, 21-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. तिसऱया मानांकित लक्ष्य सेनने इजिप्तच्या अदहम हातीम एल्गामलचा 21-15, 21-7 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. स्वीडनच्या फेलिक्स बुरेस्टेडविरुद्ध त्याचा पुढील मुकाबला होईल.

महिला दुहेरीत राष्ट्रकुल कांस्यविजेत्या अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी दुसरी फेरी गाठताना आपल्याच देशाच्या जनानी अनंतकुमार व दिव्या आर. बालसुब्रमण्यम यांच्यावर 21-7, 19-21, 21-13 अशी मात केली. अश्विनी-सिक्की रेड्डी यांना या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. अन्य भारतीयांत आकर्षी कश्यपने अनुरा प्रभुदेसाईचा 21-14, 21-14 असा पराभव केला तर राहुल यादव चित्ताबोईनाला स्पेनच्या लुईस एन्रिक पेनाल्व्हरने माघार घेतल्याने पुढे चाल मिळाली. कश्यपची पुढील लढत राखीवमधून बढती मिळालेल्या केयुरा मोपतीविरुद्ध होईल. मोपतीने स्मित तोश्निवालवर 15-21, 21-19, 21-8 अशी मात केली. राहुलची लढत आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनशी होणार आहे. एन्ग्युएनने अजय जयरामला 19-21, 21-7, 21-15 असा पराभवाचा धक्का दिला. महिलांच्या एका सामन्यात तान्या हेमंतने सई उत्तेजित राव चुक्काचा 9-21, 21-12, 21-19 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे. पीव्ही सिंधू, के.श्रीकांत, समीर वर्मा यांनी याआधीच दुसरी फेरी गाठली आहे.

Related Stories

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

Patil_p

महाराष्ट्राविरूद्ध ओडिसाची 5 बाद 220 धावांपर्यंत मजल

Patil_p

महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी बाबर आझम, फक्र झमान यांची शिफारस

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाची बार्टी मानांकनात आघाडीवर

Patil_p

माजी क्रिकेटपटू प्रशांत मोहपात्रा यांचे कोरोनाने निधन

Patil_p

निकोलस पूरन, रोस्टन चेस विंडीजचे उपकर्णधार

Patil_p