Tarun Bharat

सार्व.बांधकाम खात्याच्या भरतीत महाघोटाळा

अभियंता पदासाठी मंत्र्यांनी घेतले पैसे, बाबूश मोन्सेरात यांच्या आरोपाने एकच खळबळ

प्रतिनिधी/ पणजी

एका अनपेक्षित घडामोडीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे सुमारे 70 कोटीचे घबाड सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी उघड केले. सार्वजनिक बांधकाम खात्याचा कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक साहाय्यक या 368 पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला असून सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनीच आणि त्यांचे मुख्य अभियंत्यांनी प्रत्येक 25 ते 30 लाख रु. घेतल्याचा सनसनाटी आरोप केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असून त्वरित ही पदे रद्द करा अन्यथा आपण न्यायालयात जाईन, असा खणखणीत इशाराही दिला आहे.

या सनसनाटी आरोपामुळे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांमुळे नव्हे तर खुद्द सत्ताधारी आमदारांमुळेच अडचणीत आले. गेले कित्येक दिवस राज्यातील नोकऱया विकल्या जात असल्याचे आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून होत होते. परंतु आता चक्क सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच गंभीर स्वरुपाचे आरोप सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांवर केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे भेटावयास गेलेल्यांमध्ये टोनी फर्नांडिस आणि फ्रान्सिस सिल्वेरा या दोन भाजपच्या आमदारांचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक साहाय्यक या पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. अनेक हुशार मुले त्यात सहभागी झाली होती. प्रत्यक्षात मात्र अनेक हुशार विद्यार्थ्यांना दोन आणि तीन मार्क त्यांच्यासमोर दाखविण्यात आले आहेत. आपण सखोल चौकशी केली त्याचबरोबर आपल्याला काही पुरावे देखील सापडले त्यानुसार सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी एक-एका पदासाठी 25 ते 35 लाख रु. घेतले असल्याचा सनसनाटी आरोप संतप्त बाबूश मोन्सेरात यांनी केला. पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता, संतप्त मोन्सेरात म्हणाले की, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते विकून खाल्ले, आता गोरगरीब व्यक्तींकडून नोकऱयांसाठी पैसे घेऊन आपली पोटे भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबतीत आता पण गप्प बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

त्वरित यादी रद्द करा ः मोन्सेरात

बाबूश मोन्सेरात यांनी दोन आमदारांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्र्यांने नोकऱयांसाठी पैसे घेतल्याची माहिती दिली आणि ही सर्व पदे तातडीने रद्द करा, नव्याने मुलाखती स्टाफ इलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात यावे आणि याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी यात थंडा प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. आपण सार्वजनिक बांधकाममंत्र्याला आणि मुख्य अभियंत्याला बोलवून घेतो असे ते म्हणाले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाने आपण समाधानी नाही आहोत जर ही पदे रद्द केली नाहीत तर जनतेच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल आणि एवढे करुन आम्ही गप्प बसणार नाही तर थेट न्यायालयात जाऊ, असा इशारा देखील मोन्सेरात यांनी सरकारला दिला.

70 कोटींचा घोटाळा

 ‘तरुण भारत’शी बोलताना मोन्सेरात यांनी सांगितले की, आपल्याकडे पुरावे आहेत काही जणांनी पैसे दिल्याचे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी किमान 200 जणांकडून तरी 25 ते 30 लाख प्रत्येकी घेतले असावे आणि हा घोटाळामुळी रु. 70 कोटींचा झाला आहे असे ते म्हणाले. काही मुले त्यांची निवड होऊन देखील त्यांचा निकाल विरोधात लागल्याने आत्महत्या करु शकतात, अशी भीती मोन्सेरात यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सुदिन यांनी असे कधी केले नव्हते

यावेळी बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले की, सुदिन ढवळीकर हे अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते परंतु त्यांनी असा प्रकार कधीही केलेला नव्हता. पण आता मंत्र्यांनीच सार्वजनिक बांधकाम खाते विकून खाल्ले अशी मल्लीनाथी त्यांनी केली.  

अधिसूचना मागे घेणार नाही आणि

कोणाकडूनही पैसे घेतले नाही ः पाऊसकर

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याशी संपर्क साधला असता 368 पदांसाठी मुलाखती झालेल्या आहेत आणि त्यासाठी झालेल्या परीक्षा व त्यांचे निकाल ही संपूर्ण जबाबदारी पणजीच्या शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) वर सोपविण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या निकालानंतरच सरकारने नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली आणि निवडलेल्या सर्व व्यक्तींची नावे राजपत्राद्वारे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता ही नावे मागे घेण्याचा प्रश्नच नाही. एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दीपक पाऊसकर यांनी पैसे घेतल्याचे आरोप फेटाळून लावले. या कामी आम्ही पैशांचा मुळीच व्यवहार झालेला नाही. परीक्षेचा निकाल आम्ही बनवलेला नसून तो पॉलिटेक्नीकने बनविला आहे असे सांगून कोणत्याही परिस्थितीत जाहीर केलेली यादी मागे घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले व आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.  

सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार ः विजय सरदेसाई

दरम्यान, गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारवर जहाल टीका केली आहे. गेले कित्येक दिवस आम्ही हे सरकार नोकऱया विकत आहे असा जो आरोप करीत आहोत त्यावर आता सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच शिक्कामोर्तब केलेले आहे. यापेक्षा आणखीन कोणता पुरावा हवा. हे सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे ते म्हणाले.  

भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

दरम्यान, रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराने मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या केलेल्या आरोपासंदर्भातील व्हिडिओ पक्षाच्या काही पदाधिकाऱयांनी थेट पक्षश्रेष्ठींना थेट नवी दिल्लीला पाठविलेला आहे. या एका रॅकेटमध्ये केवळ एक मंत्रीच नसून अनेक नेते सहभागी झाले असावेत असा कयासही त्यांनी व्यक्त केला असून पक्षश्रेष्ठींनी याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणीही पदाधिकाऱयांनी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडे केली आहे.

Related Stories

पिछाडीवरून वास्को क्लबने गार्डीयन एँजलला केले पराभूत

Amit Kulkarni

19 वर्षीय दत्तप्रसाद गावकरचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni

सावर्डे जंक्शनवर पंचायतीतर्फे दिशादर्शक फलकाची सोय

Amit Kulkarni

काणकोणात काँग्रेस – गोवा फॉरवर्ड संघटितपणे काम करणार

Amit Kulkarni

केरी सत्तरीत घरावर झाड कोसळून नुकसान

Amit Kulkarni

आयवर्मेक्टिन औषधाचा प्रयोग गोमंतकीयांवर करणार का ?

Amit Kulkarni