Tarun Bharat

सावंतवाडीतील हुकुमशाही कारिवडेत चालणार नाही!

Advertisements

जि. प. माजी सभापती मंगेश तळवणेकर यांचा इशारा

ग्रामस्थांचा विरोध असतानाही घनकचरा प्रकल्पाचे काम केल्याचा आरोप

प्रकल्प स्थगित न केल्यास संघर्ष अटळ!

प्रतिनिधी / ओटवणे:

कारिवडे ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाचा ‘ना हरकत’ दाखला नसताना तसेच घनकचरा प्रकल्पाला कारिवडेवासियांचा कडाडून विरोध असताना सावंतवाडी नगरपरिषदेने हुकूमशाहीने घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू केले. याला कारिवडे ग्रामस्थांचा प्रखर विरोध असून हा प्रकल्प स्थगित न केल्यास आता संघर्ष अटळ आहे. सावंतवाडीतील हुकूमशाही आता कारिवडेत चालू देणार नाही, असा इशारा माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष  मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी नगर पालिकेला दिला आहे.

तळवणेकर पुढे म्हणाले, सध्या कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी कलम 144 यामुळे ग्रामस्थांना सध्या आंदोलनात्मक काहीही करता येणार नाही, याचा गैरफायदा घेऊनच सावंतवाडी नगरपालिकेने घनकचरा प्रकल्पाची सुरुवात केली. याचा कारिवडे ग्रामस्थ निषेध करत आहेत. या प्रकल्पापासून अगदी 50 फुटांवर शेकडो वर्षांची घरे, शेती असताना कचरा प्रकल्प सुरू करणे ही एक प्रकारची दादागिरीच आहे. त्यामुळे कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी संपल्यानंतर या प्रकल्पाच्या विरोधात पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मंगेश तळवणेकर यांनी स्पष्ट केले.

या बाबत तळवणेकर म्हणतात, 1997 पासून आपल्या तीन टर्म सरपंचपदाच्या कालावधीत व नंतरच्या सरपंच, ग्रामस्थांनी आतापर्यंत या प्रकल्पाला विरोधच केलेला आहे. तीन वर्षांपूर्वी सदर जागेत कंपाऊंड वॉल मंजूर झाले, त्यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी आमच्यासोबत जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी, तुम्ही आंदोलन करू नका. जागा नगरपालिकेची आहे, त्यांना कंपाऊंड वॉल बांधण्यास अडथळा करू नका. त्यात प्रकल्प चालू करायला किंवा इमारत बांधकाम करायला परवानगी ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय मुळीच देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, तरीसुद्धा गावात प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी कोरोना लॉकडाऊन व संचारबंदीची संधी साधण्यात आल्याने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱयांनी हीच ती वेळ या शब्दांची पुनरावृत्ती करून दाखवली आहे. मात्र, आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत. या कालावधीत काहीही तक्रार करणार नाही. मात्र, लॉकडाऊन संपल्यावर आंदोलन करू व हा प्रकल्प बंद करण्यास भाग पाडू. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यात हस्तक्षेप करून ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाचा ‘ना हरकत’ दाखला घेतल्याशिवाय सुरू असलेला प्रकल्प विनापरवाना ठरवून तात्काळ बंद करावा आणि त्या ठिकाणी उद्यान, गार्डन, पर्यटन प्रकल्प सुरू करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

कचरा प्रकल्प सुरक्षित करा!

सुक्या कचऱयापासून खतनिर्मितीची मोठी गर्जना करणारी ही मंडळी या जागेत मैला टाकणार आहेत. त्यांनी या जागेत चाळीस फूट खड्डे मारले आहेत ते कशासाठी? सावंतवाडी बेळगाव हायवेला लागून असलेल्या याच पालिकेच्या कचरा प्रकल्पाची सध्याची अवस्था काय आहे? सुंदरवाडीत येणाऱया पर्यटकांचे स्वागत शहराच्या सीमेवर प्रथम हाच दुर्गंधी प्रकल्प करीत आहे. येथून ये-जा करणाऱया सर्वांनाच इथे श्वास रोखून धरावा लागतो. स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यावर इथे स्वच्छता करण्याची नाटके केली जातात. नगराध्यक्षांपासून मुख्याधिकारी यांनी तिथे येऊन दोन मिनिटे उभे राहून दाखवावे. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून नवीन स्ट्रटेजीज बनवून नवीन प्रकल्प उभारणी करण्यापेक्षा साधे उपाय करून आहे तोच कचरा प्रकल्प सुरक्षित करावा.

प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय नाही!

भाजपच्या ताब्यात असलेल्या कारिवडे ग्रामपंचायतीकडून भाजपकडेच असलेल्या नगरपालिकेला ‘प्रकल्प रद्द करा’ अशी गयावया करूनही सावंतवाडी नगरपालिका ‘हम करो सो’ वागत असेल तर संघर्षाचा वारसा असलेल्या कारिवडेवासीयांना येत्या काळात प्रखर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा तळवणेकर यांनी दिला आहे.

Related Stories

चिपळुणात दोन मित्रांचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

Patil_p

तिवरे पुनर्वसन वसाहत भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

Patil_p

अल्पवयीन मुलीशी गैरप्रकार, तरूणाला 5 वर्षे सक्तमजुरी

Patil_p

सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदारांवर अन्याय

NIKHIL_N

रत्नागिरी बाजारपेठ बंदला व्यापाऱयांचा नकार

Patil_p

सावंतवाडी रुग्णालयाला एक्स-रे, ईसीजी मशीन

NIKHIL_N
error: Content is protected !!