पाश्चिमात्य देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने हैदोस घातला आहे. कोरोना आणि अन्य काही संसर्गजन्य आजार जगभर घोंगावत आहेत. कोरोनाचा कहर कमी झाला. लवकरच भारत कोरोनामुक्त होणार आणि सर्वाचे कोरोना लसीकरण होईल असे वाटत होते. कोरोना साथीत भरडले गेलेले जगभरचे नागरिक आणि भारतीय अक्षरश: वैतागले आहेत. कधी एकदा हे अरिष्ट संपते आणि सारे भय संपून मोकळा श्वास घेतो असे झाले आहे. मास्क जाळून टाकून आप्तजनांना कवेत घेता येते यांची सर्वांना प्रतीक्षा होती व आहे. पण, दिवाळीनंतर ज्या बातम्या येत आहेत त्या पुन्हा धडकी भरवणाऱया आहेत. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोरोनाने जाता जाता पुन्हा काही ठिकाणी हातपाय पसरायला प्रारंभ केला आहे. कोरोनाची दुसली लाट शक्य आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. काही महानगरात पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करा असे सुचवले जात आहे. एकूणच कोरोनाचे भय आणि साथ संपलेली नाही. दिवाळी काळात आणि नंतरही आपण सारे जे वागलो, वावरलो, बेफिकीर झालो त्याची किंमत मोजायला लागणार असे दिसते आहे. गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स पाळा, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, स्वच्छता ठेवा, फटाके उडवू नका असे वारंवार ओरडून सांगितले जात होते. सर्वांना ते माहीत होते पण जो तो स्वत:ला अपवाद समजून बाजारात उतरला होता. परिणाम म्हणून सर्व गावे आणि मोठी शहरे यांचे प्रमुख रस्ते व बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत होत्या. याच गर्दीत छटपूजेला परवानगी आणि मंदिर उघडा म्हणून आंदोलने सुरू होती. निवडणुका व राजकारण यांना उसंत नव्हती, दिवाळीत समुद्र किनारे व पर्यटन यानाही गती आली. पुढे थंडीचा महिना आहे. हवेचे प्रदूषण होईल, फटाके उडवू नका, ध्वनी व हवा प्रदूषण थांबवा असे सर्वत्र सांगितले जात होते. हरित न्यायालयाने फटाके विक्री व वापर यावर देशातील काही महानगरात बंदी घातली होती. कायद्याचा धाक म्हणून तेथे फटाके उडवले गेले नाहीत. परंतु इतरत्र फटाक्याचा धूर निघालाच. दिवाळी हा मोठा सण असतो. दिवाळीला सणाची महाराणी म्हणतात. ओघानेच खाणे, पिणे, फिरणे खरेदी अशी चौफेर मजा असते आणि लोकांच्या या मानसिकतेचा फायदा उठवत फसवणूक, प्रदूषण, भेसळ अशा गोष्टींना उचल खाल्लेली असते. दिवाळी, लक्ष्मीपूजन व पाडवा-भाऊबीज नंतर सारा आसमंत धुरानी भरलेला आणि फटाक्यांच्या दुर्गंधाने व्यापला होता. या साऱयाचा परिणाम मानवी जीवनावर व प्राणीमात्रावर होणार हे सांगायला नको. दिवाळी, फराळ, फटाके, थंडी आणि आजारपण हे चक्र नेहमीचेच आहे. कोरोनाची जागृती आणि कोरोनाची दहशत यामुळे यावर्षी लोक शहाण्यासारखे वागतील, संयम पाळतील, नियमांचे पालन करून दिवाळीचा आनंद घेतील असे वाटत होते पण मार्चपासून कोंडलेल्या लोकभावना उफाळल्या आणि अनेक लोकांनी सारे नियम गुंडाळून दिवाळी साजरी केली. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आज अखेरची देशाची कोरोना आकडेवारी सांगते की देशात 90 लाखापेक्षा जास्त जणांना कोरोना बाधा झाली. एक लाख 32 हजार बळी गेले तर जगात 4 कोटी 80 लाख लोकांना बाधा झाली व 13 लाख 80 हजार जणांचा बळी गेला. गेल्या अनेक शतकात इतकी मोठी आणि संहारक साथ दुसरी नसावी. ही साथ अजून संपलेली नाही. ती अजून किती थैमान घालते, बळी घेते हे बघावे लागेल. कोरोनामुळे एका-एका व्यक्तीला, कुटुंबांना आणि देशाला फटका बसला आहेच पण अवघ्या विश्वालाही या साथीने जबर तडाखा दिला आहे. एका पिढीवर या साथीचे गंभीर परिणाम झाले आहेत आणि या साथीचे अंतरंग जसे उलगडेल तसे यातील बारकावे, भयानकता आणि हानी स्पष्ट होईल. पण दिवाळीची मजा आणि गर्दी अंगाशी आली आहे. मास्क फेकून किंवा गळय़ात अडकवून खरेदीसाठी केलेली गर्दी आणि भेसळयुक्त तेलातील फराळ कंठाशी येणार अशी लक्षणे आहेत. कोरोना संक्रमणाचा यु टर्न डोकेदुखी ठरणार अशी चिन्हे आहेत. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. हरियाणाने पुन्हा आपल्या शाळा बंद केल्या. अहमदाबाद, सुरत, राजकोटमध्ये रात्रीची संचारबंदी घोषित करण्याची वेळ आली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातही भीती आहे. मुंबईच्या महापौरांनी लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि विमान प्रवास यावर निर्बंध आणा अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. उत्तर प्रदेशने दुसऱया लाटेचा अलर्ट जाहीर केला आहे. दिल्ली आणि अहमदाबादमधील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. एकूणच कोरोनाचा यु टर्न तापदायक ठरणार असे दिसते आहे. कोरोना साथ आटोक्यात आली. घटत्या आकडेवारीला जनसामान्यांनी सोडलेले भान अंगलट येणार असे दिसते आहे. दुसरी लाट समोर दिसत असताना अजूनही मंडळी विनामास्क हिंडत आहेत. मास्क गळय़ात अडकवून उघडय़ावर काहीही खात, पित गर्दी करत आहेत. स्वच्छता व नागरिकत्वाची जबाबदारी खुंटीला टांगून सारे व्यवहार सुरू आहेत. भारतासारख्या 130 कोटीच्या देशाला ही दुसरी लाट असह्य ठरण्याची भीती आहे. वेळीच पुन्हा सावध झाले पाहिजे. कोरोनाचा यु टर्न रोखला पाहिजे आणि वैयक्तिक व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कोरोनामुक्तीला कर्तव्यभावनेने साथ दिली पाहिजे. जीव वाचवणे, जीव जगवणे आणि कोरोनाचा पूर्ण बीमोड या लक्ष्यापासून तीळमात्र विचलित होऊन चालणार नाही. आकडेवारीने धोक्याची घंटा वाजवली आहे. सावध, सतर्क झाले पाहिजे. सावधान, कोरोना यु टर्न घेतो आहे. बेफिकिरी अंगलट येऊ शकते. वेळीच सावध पवित्रा घेतला पाहिजे.


previous post
next post