Tarun Bharat

सासष्टीतील 24 ग्रामपंचायतीमध्ये संगीत खुर्चीचा खेळ

प्रतिनिधी/ मडगाव

सासष्टी तालुक्यात एकूण 30 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 24 ग्रामपंचायतीनी पाच वर्षात 69 सरपंच व 47 उपसरपंच पाहिले. तर केवळ सहा पंचायतीं संगीत खुर्चीच्या खेळापासून दूर राहिल्या व त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. शासनाने पंचायतींना पुरेसे अधिकार दिले नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. मात्र, सत्तेसाठी ग्रामपंचायत पातळीवरसुद्धा किती संघर्ष होतो हे संगीत खुर्चीवरून नजरेस येते.

विशेष म्हणजे सासष्टीत केवळ सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांनी कोणताही बदल न करता पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. वेळळी, धर्मापुर-शिर्ली, तळावली, कामुर्ली, बेताळभाटी आणि ओर्ली या ग्रामपंचायतीचा त्यामध्ये समावेश होत आहे. उर्वरित 24 पंचायतींपैकी 19 पंचायतींमध्ये निवडून आलेल्या पंचायत सदस्यांमध्ये रोटेशन पद्धतीने सरपंच-उपसरपंच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिलांनाही हवे असते ‘रोटेशन’

तालुक्मयात गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक सरपंच वार्का आणि रूमडामळ-दवर्ली पंचायतींनी पाहिले. दोन्ही ग्रामपंचायतींनी प्रत्येकी सहा जणांनी आळीपाळीने सरपंचपदावर कब्जा केला. योगायोगाने रूमडामळ-दवर्ली ग्रामपंचायतीत सरपंच बदलत असताना, पाच वर्षांसाठी मधुकला शिरोडकर ही महिला पंच सदस्य उपसरपंच राहिली.

महिलाही या ‘शेअरिंग गेम’मध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे दवर्ली-दिकरपाल ग्रामपंचायतीत दिसून आले. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव असले तरी पाच वर्षात पाच महिलांनी सरपंचपद भुषविले. प्रत्यक्षात फ्लॅन्सी गोम्स यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर परस्पर करारानुसार इतर चार महिलांनी रोटेशनद्वारे या खुर्चीवर कब्जा केला.

नुवे ग्रामपंचायतीने पाच वर्षात सर्वाधिक उपसरपंच पाहिले. एकूण चारजण गेल्या पाच वर्षात उपसरपंच झाले तर दवर्ली-दिकरपाल, सुरावली, काना-बाणावली आणि वार्का या तीन ग्रामपंचायतींनी प्रत्येकी तिघांनी उपसरपंचपद भुषविले.

30 पैकी 5 पंचायतींमध्ये सरपंचांनी राजीनामा दिला किंवा त्यांना पदावरून हटवण्यात आले. पारोडा आणि सारझोरा येथे सुरुवातीला निवडून आलेले सरपंच – अनुक्रमे इनासिओ तेरेझा आणि सबिता मास्करेन्हास – यांना पदावरून हटवण्यात आले आणि दोघांनीही त्यांच्या हकालपट्टीसाठी तत्कालीन स्थानिक आमदाराला जबाबदार धरले. चिचणी-देवसुवा येथे प्रथम निवडून आलेल्या सरपंच फ्लोरी परेरा यांनी राजीनामा दिला.

करमणे ग्रामपंचायतींत राजकीय संबंध बदलल्यामुळे सरपंचांना अविश्वास ठराव दाखल करून हटविण्यात आले. तर चांदोर-काव्होरिम पंचायतीच्या सरपंच सेलिना कुएल्हो फुतादो यांनी राजीनामा दिला तर उपसरपंच माफाल्डिना मार्टिन्स यांना अविश्वास ठराव दाखल करून हटविण्यात आले.

संगीत खुर्चीचा हा खेळ पाहता, इतर काही राज्यांनी निवडून आलेल्या पंचाला सरपंच किंवा उपसरपंच होण्यासाठी काही निकष निश्चित केले आहेत. त्याच पद्धतीने ते गोव्यात करण्यासाठी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

शेजारील महाराष्ट्र राज्याने सरपंच होण्यासाठी इयत्ता 7वी पर्यंतचे शिक्षण अनिवार्य केले आहे आणि सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या निवासस्थानी शौचालय असल्याची स्वयंघोषणा जारी करण्यास सांगितले आहे.

गोवा हे उच्च साक्षरता दर असलेले प्रगत राज्य आहे हे लक्षात घेता, सरपंच किंवा उपसरपंच होण्यासाठी किमान उच्च माध्यमिकपर्यंतचा अभ्यास अनिवार्य केला पाहिजे, अशी मागणी सासष्टी तालुक्यात होत आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय कॉफी पेंटिंग स्पर्धेत कालिदास सातार्डेकर यांना पुरस्कार

Patil_p

जबाबदारी पेलण्यास सक्षम : डॉ. नूतन बिचोलकर

Amit Kulkarni

प्रवास सागरच्या चित्रकलेचा

Patil_p

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आरवली वेतोबाच्या भेटीला

Anuja Kudatarkar

सीडबॉल उपक्रम राबवणे काळाची गरज : रमेश गावस

Amit Kulkarni

जलवाहिनी फुटल्याने पणजीचे पाणी तुटले

Patil_p