Tarun Bharat

साहित्यामधून अनंत मनोहर नेहमीच स्मरणात राहतील

विविध संस्थांतर्फे श्रद्धांजलीपर शोकसभा

प्रतिनिधी /बेळगाव

ज्येष्ट साहित्यिक प्रा. अनंत मनोहर हे आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या साहित्यामधून ते नेहमीच आपल्यासोबत राहतील, अशा शब्दात बेळगावमधील विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांनी अनंत मनोहर यांना श्रद्धांजली अर्पण केली. मंगळवारी आरपीडी महाविद्यालयाच्या के. एम. गिरी सभागृहात पार पडलेल्या या शोकसभेत मान्यवरांनी अनंत मनोहर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

व्यासपीठावर आरपीडी व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णी, सदस्य सेवंतीलाल शहा, लेखिका माधुरी शानभाग, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे, प्रा. शोभा नाईक आदी उपस्थित होते. आरपीडी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी प्रास्ताविक करून ‘राब’ व ‘जॅकपॉट’ या मनोहरांच्या दोन कथासंग्रहांविषयी माहिती दिली. अरण्यकांड या कथेतून त्यांनी जंगलातील वन्यजीवांचे विश्व दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. एसकेई सोसायटीच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णी यांनी शोक ठराव मांडत सरांच्या आठवणी सांगितल्या.

व्यंगचित्रकार जगदीश कुंटे म्हणाले, तरुण भारतचा दिवाळी अंक हा मनोहर सरांच्या लेखाशिवाय पूर्णच होत नव्हता. त्यांच्या लेखनाची शैली इतरांपेक्षा वेगळी असल्याने त्यांच्या लेखांची सर्वत्र चर्चा होत असे. तरुण भारत, लोकमान्य गंथालय, तसेच वाङ्मय चर्चा मंडळ यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. या सर्व संस्थांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच म्हैसूर येथील डॉ. माणिक बेंगेरी यांनीही दूरध्वनीवरून संवेदना व्यक्त केल्या.

सेवंतीलाल शहा यांनी एक व्यक्ती म्हणून अनंत मनोहर यांचे पैलू उलगडले. त्यांची दृष्टी नेहमी नवीन विषय शोधून त्यावर लिखाण करण्यावरच असायची, असे त्यांनी सांगितले. लेखिका माधुरी शानभाग यांनी शारदोत्सवतर्फे श्रद्धांजली वाहताना, लेखन करताना कोणतीही समस्या आल्यास सरांशी संपर्क होत होता. लेखनामध्ये कोणत्या उणीवा आहेत हे सर आठवणीने सांगत, असे सांगितले.

सरस्वती वाचनालय व शब्दगंध कवी मंडळातर्फे प्रा. स्वरूपा इनामदार यांनी श्रद्धांजली वाहिली. सर जरी कमी बोलत असले तरी त्यांच्या लेखनातून ते बरेच काही सांगून जायचे, असे त्या म्हणाल्या. खानापूर येथील दिलीप सावंत म्हणाले, ग्रामीण भागातून विद्यार्थी कोणत्या तळमळीने व हालअपेष्टा सहन करत शिक्षण घेतात याची जाण सरांना असल्यामुळे ते नेहमी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत असल्याची आठवण सांगितली. मंथन कल्चरल सोसायटी, जयभवानी सोसायटी व हिंद सोशल क्लबतर्फे शोभा लोकूर, वाङ्मय चर्चा मंडळातर्फे प्रा. अनिल पाटणेकर, मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे नितीन कपिलेश्वरकर, प्रा. दत्ता नाडगौडा यांनी श्रद्धांजली वाहिली. बुक लव्हर्स क्लबतर्फे मंगेश देऊळकर, वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे बी. बी. शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

अनंत मनोहर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोकसभेची सुरुवात झाली. यावेळी बेळगाव परिसरातील साहित्य क्षेत्राशी निगडीत विविध संघ व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

ग्रा. पं. जमिनींवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

Omkar B

नियमित व्यायाम, खेळामुळेच तंदुरुस्त राहता येते

Amit Kulkarni

सोनोलीच्या महिलांचा बेळगुंदी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा

Patil_p

परीक्षा घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक

Omkar B

ऑटोरिक्षा, कॅब चालकांना मदतीसाठी अर्जाचे आवाहन

Amit Kulkarni

शनिवारी 226 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p