Tarun Bharat

साहित्यिक, इतिहास संशोधक ऍड.पांडुरंग नागवेकर यांचे निधन

Advertisements

वार्ताहर / सावईवेरे :

गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष, इतिहास संशोधक, लेखक तसेच सुप्रसिद्ध वकील ऍड. पांडुरंग नागेंद्र नागवेकर (71 वर्षे) यांचे काल गुरुवार 30 रोजी सकाळी निधन झाले. मूळ वळवई फोंडा येथील ऍड. नागवेकर यांचे गोव्यातील कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात व्यापक कार्य होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ऍड. नागवेकर हे पेशाने वकील असले तरी विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटविली होती. आज शुक्रवार 1 रोजी सकाळी 9 वा. वळवई येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी शिल्पमाला, विवाहित कन्या सौ. प्रियांका व सौ. सोनिया, पुत्र नागेंद्र असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबई येथे त्यांच्या घशावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. उपचारानंतर बरे होऊन ते पुन्हा घरी परतले होते. हल्लीच त्यांनी वळवई येथील ललितप्रभा नाटय़मंडळाच्या एका व्यासपीठीय कार्यक्रमात भाग घेऊन भाषणही केले होते. त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली व काल गुरुवार 30 एप्रिल रोजी सकाळी 7.15 वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कला, साहित्य क्षेत्रात विपुल कार्य

 ऍड. नागवेकर यांनी सन 1974-1982 या काळात वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात वकिली सुरु केली.  वकिलीचा व्यावसाय सांभाळीत कला, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रात त्यांचा समांतर प्रवास सुरु झाला.  पणजी येथील गोमंतक मराठी अकादमीचे 2002 ते 2005 या कालावधीत ते अध्यक्ष होते. त्यापूर्वी पाच वर्षे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. गोव्याच्या रंगभूमी क्षेत्रातील सुप्रसिद्ध अशा ललितप्रभा वळवई या संस्थेचे अध्यक्ष तसेच ललितप्रभाच्या अमृतमहोत्सवी मराठी नाटय़ संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

  इतिहास संशोधनपर लेखन

 गोमंतक साहित्य सेवक मंडळ व मराठी साहित्य क्षेत्राशी निगडीत इतर काही संस्था व उपक्रमांमध्ये ते सक्रीय असायचे. वळवई येथे भरविण्यात आलेल्या 21 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. विविध क्षेत्रात वावरतानाच इतिहास व त्यासंबंधीच्या लेखनाचा व्यासंग त्यांनी कायम जपला. गोवा, महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक विषयांवर त्यांनी इतिहास संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेला ‘जागर श्री मंगलमूर्तीचा’ हा ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथ 2014 साली प्रकाशित झाला. दै. तरुण भारतसह गोव्यातील विविध दैनिके व नियतकालिकेतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. शिल्पकार, कालिका व अन्य नियतकालिकातून त्यांचे इतिहास संशोधनपर लेखन प्रसिद्ध झाले आहे.

 विविध सरकारी समित्यांवर काम

 गोवा सरकाच्या आर्थिक विकास महामंडळाचे माजी संचालक, तसेच सरकारच्या विविध समित्यांवरही तज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिले. सन 2012-2015 या कालावधीत कला व संस्कृती संचालनालयाच्या पुस्तक निवड समितीवर ते होते. प्रकाशक व लेखकांसाठीच्या आर्थिक साहाय्य योजना समितीचे सभासद, आरोग्य खात्याच्या पीसी ऍण्ड पीएनडीटी समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  वळवई येथील श्री गजान्तलक्ष्मी मंदिरच्या जिर्णोद्धार शताब्दी महोत्सवाचे महासचिव व देवस्थानच्या विविध कार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असायचा.

 त्यांच्या निधनाबद्दल विविध संस्था तसेच मान्यवर व असंख्य हितचिंतकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

 ऍड. नागवेकर यांचे कार्य संस्मरणिय – रोहिदास नाईक

 ऍड. पांडुरंग नागवेकर हे जाज्वल्य मराठी प्रेमी व इतिहासाचा व्यासंग असलेले अभ्यासक होते. मराठी भाषा व साहित्य, त्याचबरोबरच गोव्यातील मराठी चळवळीत त्यांचे कार्य व योगदान निश्चितच दखलपात्र आहे, अशा शब्दात माजी आमदार तथा स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Related Stories

महसूलबुडव्या खाण कंपन्यांना पाठविणार नोटिसा

Patil_p

बालवयात साहित्यनिर्मिती हे आजच्या मुलांसाठी प्रेरणादायी कार्य

Amit Kulkarni

दुकानातील मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक

Amit Kulkarni

गोवा मद्यार्क विक्रेता संघटनेची मुख्यमंत्र्यांना भेट

Omkar B

देवाबाग येथे पार्क केलेल्या बुलेटला आग दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Amit Kulkarni

फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!