Tarun Bharat

साहित्यिक सावित्री

सा वित्रीबाई फुले म्हणजे एक आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श शिक्षिका, समाजसेविका म्हणून परिचित आहेत. स्त्राr शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी सावित्री… स्त्राr-मुक्ती चळवळीची अग्रणी सावित्री… जुन्या रुढी, अंधश्रद्धा याचे उच्चाटन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारी सावित्री… तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडून सार्वजनिक कार्यासाठी वाहून घेतलेली सावित्री… दुष्काळात अन्नासाठी तडफडणाऱया हजारो जीवांच्या मुखात घास भरवणारी सावित्री… जनावरांप्रमाणे जीवन जगणाऱया स्त्राr शुद्रांना माणसात आणण्याचे वेड लागलेली सावित्री… दीन दलितांच्या मुलांची सेवा करणारी सावित्री… निरक्षर कुटुंबात जन्मलेली पण जोतिबांच्या मदतीने शिक्षण घेऊन ज्ञानयोगिनी बनलेली सावित्री… जन्मत:च काव्यप्रतिभा लाभलेली सावित्री…

सावित्रीबाई…! या एक प्रतिभासंपन्न कवयित्री, एक बुद्धिमान लेखिका म्हणूनही परिचित होत्या. त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘काव्यफुले’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह इ. स. 1854 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरा काव्यसंग्रह ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा इ. स. 1892 मध्ये प्रसिद्ध झाला. शिवाय त्यांनी जोतिबांना लिहिलेली पत्रे आहेत. जोतिबा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद सावित्रीबाई&ंकडे आले. त्या वेळी त्यांनी केलेली भाषणे संग्रहीत आहेत.

‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. त्यामध्ये निसर्गवर्णनपर, आत्मपर, सामाजिक व स्फुट कविता असे वेगवेगळे विषय आहेत. ‘मानव आणि सृष्टी’ या निसर्ग कवितेत त्या म्हणतात,

झिमझिम येई पाऊस, बहरली सृष्टी सारी,

फळाफुलांचा, वेलबुट्टीचा, नेसते शालू भारी,

  निसर्ग आहे म्हणून माणूस आहे. निसर्ग माणसांना जीवन देतो. त्याचप्रमाणे माणसांनी स्वत: जगावं आणि इतरांना जगू द्यावं हा विचार कवितेतून मांडताना त्या लिहितात,

  सुंदर सृष्टी सुंदर मानव जीवन सारे

  सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू ‘वा’ रे,

  मानव जीवन हे विकसूया

  भय चिंता सारी सोडुनिया

 सावित्रीबाईंनी ही कविता साधारण पावणेदोनशे वर्षापूर्वी लिहिली आहे. पण आज या एकविसाव्या शतकात मानवतेची शिकवण देणारी ही कविता आहे. कारण आजचा माणूस हा माणूसपण हरवलेल्या स्थितीत दिसत आहे. त्याला दिशा देण्याचे कार्य ही कविता करते.

  सावित्रीबाईचं वय होतं फक्त नऊ वर्षाचं. खरं तर हे वय तसं खेळण्याबागडण्याचं. पण नवव्या वषी त्यांचा विवाह तेरा वर्षाच्या जोतिबांशी झाला. आपल्या संसाराविषयीच्या भावना एका तरल अशा उपमेने त्या सांगतात, ‘संसाराची वाट’ या कवितेत.

 माझ्या जीवनात जोतिबा स्वानंद

 जैसा मकरंद कळीतला

 जोतिबांसारखा भाग्यवंत पती मिळाला म्हणून त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम, आदर, ऋणानुबंध सर्वानाच असतो. मग सावित्रीच्या लेखणीतून तो कसा सुटेल? ‘माझी जन्मभूमी’ या कवितेत नायगाव या जन्मगावाबद्दलचे वर्णन करताना म्हणतात,

 शिवप्रभूने राज्य स्थापिले कुणबी मराठय़ाचे

 स्वराज्य झाले लोकहिताचे

 नायगाव खेडेसुद्धा सुखसमृद्धीचे असे

 चालवी पाटीलकी कारभारी नेवसे ।।

अगदी कृतज्ञतापूर्वक त्यांची लेखणी धावताना दिसते. सावित्रीबाईंची काव्यरचना म्हणजे सामाजिक उत्क्रांतीचा, शिक्षणप्रसाराचा, समाजसेवेचा, जनजागरण करण्याचा एक चालता बोलता इतिहास होता. स्वत:चा संसार, घरदार, ऐहिक सुखाला ठोकरून जगाचा संसार सांभाळणारी सावित्री होती.

त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर जाणवते की, सामाजिक विकासाचा, स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेणाऱया, स्त्री शुद्रांना वेदनांना शब्दरुप करून एक हळूवार फुंकर घालत त्यांना जागृत करण्याचे कार्य करणाऱया थोर सावित्री होत्या. त्यांच्या लेखणीतून आत्मिक संवाद साधलेला आहे. दु:खी मनाला साकार करून, वस्तुस्थिती समजावून सांगून अज्ञान, अन्याय दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एक माणूस म्हणून त्या किती महान होत्या, याचा प्रत्यय येतो. मानवताधर्म विसरत चाललेल्या माणसाला वैचारिक सल्ला त्यांच्या साहित्य वाचनातून मिळतो.

सावित्रीबाईंनी स्वत: दगड, धोंडे, चिखल, शेण झेलले, म्हणूनच आजच्या स्त्रीवर अभिमानाने हसत हसत फुले उधळली जात आहेत. त्यांच्या आपल्या कार्यावरील आत्मविश्वास असामान्य होता. याबाबत त्या जोतिबांपेक्षा काकणभर सरसच होत्या. जोतिबांकडून प्रेरणा घेतली हे खरे असले तरी प्रेरणा घेण्याचे सामर्थ्य, धाडस त्यांच्या ठिकाणी होते. समाजकार्याचं स्फुल्लिंग त्यांच्यात जन्मत:च होतं. त्या सर्वसामान्य स्त्रीसारख्या नव्हत्याच. काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱया होत्या. आज एकविसाव्या शतकात स्त्रीमुक्ती चळवळ, महिलांमध्ये जागृती, महिला सक्षमीकरण, सबलीकरण यासाठी चर्चासत्रे मेळावे, मोर्चे, संप यांचे आयोजन करावे लागते. पण त्याकाळी प्रतिकूल परिस्थितीत जनजागृतीद्वारे स्त्रीमुक्तीसाठी सामाजिक बंडखोरीचे निशाण सावित्रीबाईंनी उंचावले म्हणूनच….

  साष्टांग नमन आमुचे तुझ्या कर्तृत्वाला ।

  त्रिवार अभिवादन माझ्या सावित्रीला ।।

माया पाटील

मराठी विद्यानिकेतन, बेळगाव

 

 

 

 

 

Related Stories

टॉवेल आर्ट

Patil_p

हवी फक्त इच्छाशक्ती

tarunbharat

चाहूल वसंताची

tarunbharat

आरोग्यासाठी प्रभात जागृती

Patil_p

यालाच मनोरंजन असे नाव

Patil_p

एक भावलेला नाटय़प्रयोग बेळगावकरांची

Patil_p