Tarun Bharat

सिंधुदुर्गच्या सुकन्येने बनविले अनोखे सॅनिटायझर मशीन

Advertisements

इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या रिया गव्हाणकरची अनोखी कामगिरी : मशीनला मोठय़ा प्रमाणात मागणी

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

लॉकडाऊन काळात केवळ मोबाईलवर टाईमपास करण्याऐवजी ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात संधी शोधत सिंधुदुर्गची सुकन्या रिया गव्हाणकर या मुंबईतील इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीने ‘पायाने चालविल्या जाणाऱया हॅण्डवॉश सॅनिटायझर मशीन’ची निर्मिती करून ती मार्केटमध्येदेखील आणली. मुंबईतील नगर पालिका, तहसील कार्यालये, हॉस्पिटल्स, बँका, कॉर्पोरेट कंपन्या इत्यादींनी या मशीनला पसंती देत त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मागणीही नोंदवली आहे. ‘फेसबूक’ व ‘वॉटस्ऍप’चा वापर करीत तिने या निर्मितीला मार्केटही मिळवलं.

लॉकडाऊन काळात युवावर्ग घरात बसून टाईमपास करीत होता. अशा काळात रिया शासनाच्या परवानगीने आपल्या वर्कशॉपमध्ये 14-14 तास काम करीत होती. तिने यात यश प्राप्त करीत युवा वर्गासमोर नवा आदर्श घालून दिला.

मॅकेनिकल इंजिनियरिंगची विद्यार्थिनी

 रिया ही वेंगुर्ल्याच्या रहिवासी रेश्मा खानोलकर व परुळे-गवाणीचे सुपुत्र राहून गवाणकर यांची सुकन्या. माजी आमदार कै. सी. आर. खानोलकर आणि प्रा. कै. एस. आर. खानोलकर यांची नात. रियाचे कुटुंबीय उद्योग व्यवसायानिमित्त वसई येथे स्थाईक आहेत. तर रिया वसईतील वर्तक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरींगचे धडे घेत आहे.

हॅण्ड सॅनिटायझर मशीन

रियाचे वडीलही इंजिनियर आहेत. तिने घरातील अडगळीतील साहित्य, वर्कशॉपमधील भंगारातील साहित्य गोळा करायला सुरुवात केली. जुन्या सायकलच्या स्प्रिंगा, लोखंडी पाईपचे तुकडे व इतर साहित्य गोळा करून तिने प्रत्यक्ष निर्मितीस सुरुवात केली. या कामी तिने आई-बाबांचे मार्गदर्शनही घेतले. दिवस-रात्र प्रयत्न करीत तिने पायाने वापरायच्या हॅण्ड सॅनिटायझर मशीनची निर्मिती केली. बनवलेल्या या नव्या मशीनची छायाचित्रे व व्हीडिओ तिने फेसबूक, व्हॉटस्ऍप् व सोशल मिडियावर टाकले. हे व्हीडिओ व फोटो पाहून महानगरपालिका, हॉस्पिलट प्रशासन व तहसील कार्यालयातून रियाला थेट बोलावणे आले. कारण तिने बनविलेल्या मशीनसारखे मशीन अन्यत्र नव्हतेच. तसेच तिने विविध प्रकारामध्ये सुमारे दोन हजार रुपयांपेक्षाही कमी खर्चात ही यंत्रे तिने बनविली. रियाची ही निर्मिती पाहून स्थानिक प्रशासनाने तिला अत्यावश्यक सेवेच्याखाली या मशीनच्या निर्मितीसाठी खास सवलती व परवानग्या दिल्या. तसेच विविध शासकीय कार्यालये, बँका, इस्पितळे, कॉर्पोरेट कार्यालये, हाऊसिंग सोसायटय़ा यासाठी रियाकडे या मशीनकरीता मागणी येऊ लागली. रियाने हे चॅलेंज स्वीकारलं. काही कामगारांना हाताशी धरलं. आई-बाबांची मदत घेतली आणि एक मोठे वर्कशॉप भाडय़ाने घेत काम सुरू केलं. दिवसाकाठी सत्तर ते ऐंशी मशीनची निर्मिती तिने सुरु केली. आतापर्यंत जवळपास 500 मशीन्स तिने विकल्या. कामगार आणि रॉ मटेरिअलचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करणे हे तिच्यासाठी चॅलेंज असणार आहे. मात्र ती हिंमत हारलेली नाही.

Related Stories

मंडणगडात 5 लाखाचे अडीच हजार किलो गोमांस जप्त

Patil_p

‘शॉर्टेज’मुळे चिकनच्या किमती भरमसाठ

NIKHIL_N

मुख्याध्यापकासह काही शिक्षक पॉझिटिव्ह

NIKHIL_N

जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

Anuja Kudatarkar

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 26 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौरा

Anuja Kudatarkar

बाहेरून आलेल्यांचा सर्व्हे होणार!

NIKHIL_N
error: Content is protected !!