Tarun Bharat

‘सिंपल सायमन’ डिसोजा यांचे निधन

काही दिवसांपासून होते आजारी : कोविडचीही झाली होती बाधा : आज सकाळी वास्कोत अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / वास्को

दाबोळी व वास्कोचे माजी आमदार तसेच गोवा विधानसभेचे माजी उपसभापती  आणि ‘सिंपल सायमन’ म्हणून ओळखले जाणारे सायमन डिसोजा यांचे बुधवारी सकाळी अल्प आजाराने गोमेकॉमध्ये निधन झाले. त्यांना कोविडचीही बाधा झाली होती. निधनसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आज गुरूवारी सकाळी 11 वा. त्यांच्यावर वास्कोत कोविड नियमांनुसार अंतिम संस्कार करण्यात येतील.

सायमन डिसोजा मागच्या पंधरा वर्षांपासून राजकारणापासून दूरच होते. मात्र, सामाजिक उपक्रमात त्यांचा सतत सहभाग असायचा. वास्कोतच त्यांची हयात गेली. मात्र, मागच्या काही वर्षांपासून ते सांकवाळ येथे आपल्या नव्या निवासस्थानी राहात होते. मागच्या सहा महिन्यात कोविड संसर्गामुळे त्यांचा बहुतेकवेळ घरीच विश्रांती घेण्यात गेला. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना निमोनिया झाल्याचे निदान झाले होते. निमोनियावरील उपचारादरम्यान त्यांना कोरोना झाल्याचेही निदान झाले. त्यातच बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. आज गुरूवारी सकाळी 11 वा. त्यांच्यावर वास्केतील सेंट अण्Ÿड्रय़ू चर्चच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सामान्य कर्मचारी, व्यवसायिक, समाजसेवक व राजकारणी

सायमन डिसोजा एकेकाळी हार्बरमध्ये चौगुले कंपनीचे कर्मचारी होते. त्यानंतर वास्कोत त्यांनी प्रिती इलेक्ट्रॉनिक्स हा व्यवसाय सुरू केला. समाजसेवेच्या आवडीतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. 1976 मध्ये ते मुरगावचे नगरसेवकपदी निवडून आले. 1984 साली त्यांना काँग्रेस पक्षाने दाबोळी मतदारसंघाची उमेदवारी दिली. तेव्हा ते प्रथमच आमदार बनले. त्यानंतर गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या वास्को मतदारसंघाची त्यांना 1989 साली झालेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली. त्यामुळे ते दुसऱयांदा आमदार बनले. दुसऱया कार्यकाळात ते गोवा विधानसभेचे उपसभापती म्हणून निवडले गेले. 1994 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार स्व. डॉ. विल्प्रेड मिस्किता यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, काँग्रेस सरकारने त्यांना मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा सन्मान केला होता. 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसने नवकाँग्रेसवासी डॉ. विल्प्रेड मिस्किता यांना वास्कोची उमेदवारी दिली. या निर्णयामुळे नाराज झालेल्या सायमन डिसोजा यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. तेव्हापासून त्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध विरळ होत गेला. सक्रीय नसले तरी ते राजकारणात वावरत राहिले. मागच्या पंधरा वर्षांत मात्र, त्यांचे राजकारणात फारसे अस्तित्व राहिले नव्हते. राजकारणापासून दूर गेले तरी त्यांचा समाजकारणात वावर होता. पर्यावरण संवर्धनाशी संबंधीत उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. विशेष म्हणजे वयाच्या 82 व्या वर्षीही ते थकलेले नव्हते. आरोग्याबद्दल त्यांची कधी तक्रार नव्हती. पस्तीस वर्षापूर्वीच्या आवेषातच ते आजही फिरायचे व विविध क्षेत्रात वावरायचे.

त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका फेलिसीटी डिसोजा, चार कन्या व एक पुत्र असा परीवार आहे.

Related Stories

अंजुणे धरणाची दुरुस्ती पूर्ण; पावसाळय़ासाठी सज्ज

Amit Kulkarni

दुबई कराटे अजिंक्यपद स्पर्धेत श्रृती देवारीला सुवर्ण

Amit Kulkarni

गोमेकॉच्या गेट बाहेरील विक्रेत्यांना हटविले

Amit Kulkarni

पोलीस मेगा भरतीत मेगा घोटाळा

Patil_p

गणेशभक्तांवर ‘दृष्टी’ ठेवणार लक्ष!

Omkar B

‘स्वयंपूर्ण गाव, संपन्न गोंय’ नवी योजना

Omkar B