Tarun Bharat

सीएए लागू होऊ देणार नाही!

Advertisements

आसाममध्ये राहुल गांधी यांचे विधान : ‘हम दो-हमारे दो’ सरकार असा उल्लेख, लवकरच निवडणूक

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

विधानसभा निवडणुकीला लवकरच सामोरे जाणाऱया आसामचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी दौरा केला आहे. तेथील शिवसागर जिल्हय़ात आयोजित प्रचारसभेत बोलताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून ‘हम दो-हमारे दो’ टिप्पणी वापर केला आहे. राहुल आणि उर्वरित काँग्रेस नेते यावेळी ‘नो सीएए’ असा उल्लेख असलेल्या गमछय़ासह दिसून आले आहेत. काहीही झाले तरीही राज्यात सीएए लागू होऊ देणार नसल्याचे हम दो, हमारे दो यांनी लक्षात घ्यावे, असे विधान राहुल यांनी केले आहे.

आसामला नुकसान झाल्यास देशाला नुकसान होणार आहे. आसामला तोडू शकणारी कुठलीच शक्ती जगात नाही. आसाम कराराला जर कुणी स्पर्श करण्याचा किंवा द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस पक्ष आणि आसामची जनता मिळून त्यांना धडा शिकविणार आहे. हम दो-हमारे दो आसाममधील साधनसंपदा लुटू पाहत असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

रिमोटने केवळ टीव्ही चालतो

रिमोटने टीव्ही चालू शकतो, मुख्यमंत्री नाही. आसामचे मुख्यमंत्री केवळ दिल्ली-गुजरातचे ऐकून घेतात. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांसाठी काम करायला हवे. सध्याचे सरकार केवळ दिल्ली आणि गुजरातचे ऐकून घेत असल्याने ते हटवावे लागणार असल्याचे राहुल म्हणाले.

चहामजुराचे उत्पन्न वाढवू

राहुल यांनी चहाच्या मळय़ांमधील मजुरांचाही मुद्दा उपस्थित केला आहे. आसाममध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास तरुणाईमधील भीतीचे वातावरण दूर करू. आसाममध्ये रोजगार निर्माण करणार आहोत. चहामजुरांना सध्या 167 रुपयांची दैनंदिन मजुरी मिळते. पण आमच्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास यात 200 रुपयांची वाढ करणार आहोत. याचमुळे चहाच्या मळय़ांमधील मजुरांना 367 रुपये मिळणार असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

आसाम बचाओ अभियान

आसाममधील सत्तेवरून भाजपला हटविण्याच्या उद्देशाने  काँग्रेसने राज्यभरात ‘आसाम बचाओ’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे स्वयंसेवक, बिगरशासकीय संघटना, नागरी समुहांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणापत्राबद्दल सर्वांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

काँग्रेस सक्रीय

आसाम काँग्रेसने बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटसोबत आघाडी केली आहे. अजमल यांच्या पक्षाचा बंगाली भाषिक मुस्लिमांमध्ये मोठा प्रभाव आहे. तर काँग्रेस पक्षाने राज्यातील बराक खोरे, उत्तर आसाम आणि लोअर आसाममध्ये राहुल तसेच प्रियंका वड्रा यांच्या तीन सभा चालू महिन्यात आयोजित करण्याची योजना आखली आहे.

error: Content is protected !!