Tarun Bharat

सीएसकेला मिळाली सरावाची परवानगी

दुबईला प्रयाण करण्याआधी 15 ऑगस्टपासून संघातील भारतीय खेळाडूंसाठी चेन्नईत होणार शिबिर

वृत्तसंस्था/ चेन्नई

19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होणाऱया 13 व्या आयपीएल स्पर्धेसाठी सर्व सहभागी संघांतील भारतीय खेळाडूंना सरावाची संधी मिळालेली नाही. पण चेन्नई सुपरकिंग्सच्या व्यवस्थापनाने यूएईला प्रयाण करण्यापूर्वी तामिळनाडू सरकारकडून संघाचे सराव शिबिर आयोजित करण्याची परवानगी मिळविली आहे. 15 ऑगस्टपासून चेन्नईतच हे शिबिर घेतले जाणार आहे.

या संघातील खेळाडू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अम्बाती रायुडू, हरभजन सिंग, पीयूष चावला व अन्य काहीजण चार्टर्ड विमानाने 14 ऑगस्ट रोजी चेन्नईत दाखल होतील आणि 15 ऑगस्टपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर सरावाला सुरुवात करतील. सीएसके संघ 21 ऑगस्ट रोजी दुबईला रवाना होणार आहे. मुंबई इंडियन्स वगळता अन्य एकाही प्रँचायजीला भारतात आपल्या संघासाठी सराव शिबिर आयोजित करणे शक्य झालेले नाही. मुंबई इंडियन्सने मात्र आपल्या बऱयाचशा खेळाडूंना मुंबईत आणण्यात यश मिळविले आहे. ‘सर्व खेळाडू एकदा चेन्नईत दाखल झाले की त्यांना दोन आठवडय़ांच्या क्वारंटाईनला सामोरे जावे लागणार नाही. कारण चेन्नईत येण्याच्या दोन दिवस आधी त्यांची कोव्हिड चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्यांना चेन्नईत पाठविले जाणार आहे,’ असे संघाच्या माहितगार सूत्राने सांगितले.

‘चेन्नईत आगमन झाल्यावर खेळाडूंना थेट हॉटेलरूममध्ये पाठविले जाईल. सहा दिवसाच्या वास्तव्यानंतर यूएईला प्रयाण करण्यापूर्वी त्यांना मैदानाव्यतिरिक्त इतर कोठेही जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. चेन्नईत असताना सर्व खेळाडूंची दोनदा चाचणी घेतली जाईल आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना दुबईला पाठविले जाणार आहे,’ असेही या सूत्राने सांगितले.

भारतीय खेळाडू गेल्या मार्चपासून क्रिकेटपासून दूर राहिले असल्याने त्यांना सरावाची अत्यंत गरज असून सीएसकेचा कर्णधार धोनीने त्यांचे शिबिर चेन्नईत घेण्याची कल्पना मांडली होती. त्याला प्रतिसाद देत सीएसकेच्या व्यवस्थापनाने गेल्या आठवडाभरापासून शिबिरासाठी परवानगी मिळविण्याचे कठोर प्रयत्न चालविले होते आणि अखेर त्यात त्यांना यशही आले आहे. ‘कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे कोटेकोर पालन करण्याचे वचन प्रँचायजींनी दिले असून स्पर्धेत भाग घेण्याआधी खेळाडूंना सरावाची किती गरज आहे, याची निर्णयकर्त्यांना पूर्ण जाणीव आहे. इतर क्रीडा प्रकारांतील खेळाडूंच्या सरावाला सुरुवात झालेली असल्याने सीएसकेसाठी ही बाबही परवानगी मिळण्यासाठी फायदेशीर ठरली आहे. संघातील एकाही विदेशी खेळाडूला आणि साहाय्यक स्टाफला चेन्नईत येण्याची परवानगी दिलेली नसल्याने संघाचा गोलंदाजी सल्लागार एल. बालाजी शिबिराची सूत्रे सांभाळणार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होईल,’ असे सूत्राने पुढे सांगितले.

लॉकडाऊन सुरू होण्याआधी 2 मार्चपासून सीएसकेच्या खेळाडूंनी चेपॉक मैदानावर सरावाला सुरुवातही केली होती आणि सराव पाहण्यासाठी त्यावेळी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. पण यावेळी कोणत्याही चाहत्याला मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य चाहत्यांनाही पूर्णपणे माहित असल्याने त्यांच्याकडून निश्चितच सहकार्य मिळेल. मैदानाबाहेर किंवा हॉटेलबाहेर ते गर्दी करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असेही या सूत्राने स्पष्ट केले.

Related Stories

जत नगरपरिषद पोट निवडणुकीत 61 टक्के मतदान

Abhijeet Khandekar

…तर दलितांना आरक्षण लाभ नाही!

Patil_p

कर्नाटक हायकोर्टाचा ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना दिलासा

Archana Banage

पन्हाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात वीजबिलांपोटी तब्बल 266 कोटींची थकबाकी

Archana Banage

अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Patil_p