Tarun Bharat

सीमेवरील रॅपीड टेस्टनंतरही होम क्वारंटाईन बंधनकारक

टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ‘सीसीसी सेंटर’मध्ये : निगेटिव्ह आल्यास ‘होम क्वारंटाईन’ : बैठका, राजकीय नेत्यांच्या दौऱयांबाबतही दक्षता हवीच

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

येत्या 22 ऑगस्ट रोजी होणाऱया गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणाऱया व लक्षणे असणाऱया चाकरमान्यांची येताना सिमेवरच रॅपीड टेस्ट केली जाणार आहे. टेस्ट निगेटिव्हनंतरही जिल्हय़ात प्रवेश करणाऱयांना होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे. क्वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांचा ठेवण्याची मागणीही अनेक स्तरातून होत आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांतील कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता पुढील काही काळ, बैठका, राजकीय दौरे न होण्याबाबतची काटेकोर दक्षता घेण्याची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर याबाबत गांभिर्याने आदेश काढत प्रसंगी कारवाईचा बडगा उचलला पाहिजे. तसेच गावागावांत गणेशोत्सव कालावधीत पूजा, आरती, भजने आदीच्या माध्यमातून संसर्गाचा धोका वाढू नये, यासाठीही दक्षता घेण्याची गरज आहे.

गणेशोत्सव कालावधीत जिल्हय़ात किती चाकरमानी येऊ शकतात, याबाबत प्रशासन पातळीवर गेले काही दिवस माहिती घेतली जात आहे. गावनिहाय माहिती  घेत त्यादृष्टीने नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. गावागावात नियमांचे उल्लंघन न होण्याबाबतची दक्षता घेण्यासाठी या कालावधीत ग्राम नियंत्रण समित्यांची जबाबदारी अधिक असणार आहे.

रॅपीड टेस्टनंतरही होम क्वारंटाईन

याबाबत आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्हय़ात प्रवेश करणाऱया चाकरमान्यांची सिमेवर रॅपीड टेस्ट करण्यात येणार आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांना ‘सीसीसी सेंटर’मध्ये दाखल करण्यात येणार आहे. तर निगेटिव्ह आल्यास नियमानुसार होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे. क्वारंटाईनचा कालावधी कमी करण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली तरीही प्रशासकीय पातळीवर अद्याप 14 दिवसांचेच क्वारंटाईन आहे. त्यात शिथीलता आल्याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

खारेपाटण येथे गुरुवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ व इतरांनी भेट देत चेक नाक्यावरील तयारीची माहिती घेतली.

बैठका, दौऱयांवर बंधन हवेच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता पुढील काही कालावधी लहान, मोठय़ा बैठकांवर कडक निर्बंध आणण्याची गरज आहे. सोशल डिस्टंसिंगचा भंग होत असेल तर कारवाई व्हायला हवी. कोणीही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या दौऱयांवर बंधने हवीत. मंत्री अथवा महत्वाच्या नेत्यांचे दौरे झालेच तर तेथेही जमावबंदी आदेशानुसार लोकांची उपस्थिती राहील, याबाबत दक्षता घ्यायला हवी. प्रसंगी अशा दौऱयात आदेशाचे उल्लंघन झाले प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे. तरच पुढील कालावधीत कोरानाचा संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.

स्वयंशिस्तही हवीच

गावी येणाऱया चाकरमान्यांना होम क्वारंटाईन असणे बंधनकारक आहे. मात्र, गणेशोत्सव कालावधीत सत्यनारायण महापूजा, वाडीवाडीमध्ये आरत्या, भजने आदीसाठी काही प्रमाणात का होईना लोक एकत्रीत येतात. अशावेळी संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या कालावधीत प्रत्येकाने स्वयंशिस्तीने वागणेही तेवढेच गरजेचे आहे. तसेच गावात या नियमांचा भंग होत असेल तर ग्राम नियंत्रण कमिटीनेही कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Related Stories

कवडीमोल भावाने हापूसची विक्री

NIKHIL_N

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत नागोबा येतात तेव्हा

Patil_p

गावठी बॉम्बमुळे बैल गंभीर जखमी

Anuja Kudatarkar

आगीत फळबागेचे पावणेतीन लाखाचे नुकसान

Patil_p

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांना पुराचा फटका

Archana Banage

वेंगुर्ल्यातील सेंट लुक्स हॉस्पिटल शासनाने ताब्यात घ्यावे!

NIKHIL_N